मुंबईसारख्या शहरात रोडशो करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासानं तास थांबावं लागतं ट्रॅफिक जाम होतं. त्यांनी ज्या भागात कार्यक्रम घेतला तो परिसर गुजराती आहे. मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग देखील होता. मात्र त्यांचं लक्ष फक्त एका वर्गावर होतं. त्यानंतर लोकांच्या तक्रारी आल्या, असं म्हणत आज सकाळी शरद पवार यांनी मोदींच्या कालच्या मुंबईतील रोड शोवर टीका केली. त्याला शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच चार टप्प्यातील मतदान आणि मुंबईत होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर शंभुराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.
नरेंद्र मोदींच्या शेड्युलनुसार आम्ही रोड शो केला होता. कुठल्याही समाजाला समोर ठेऊन रोड शो केला नाही. निवडणुकीत कुठला समाज आहे हा विचार नसतो. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल ते पाहत असतो, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
मुंबईतील मतदार महायुतीच्या पाठीशी आहे. मुंबईत महायुतीमय वातावरण आहे. शिंदे सरकारने जे कामगीरी केली आहे. त्याची पोचपवाती महाराष्ट्रातील जनता आपल्याला मागील ४ टप्यात दिली आहे आणि मुंबई देणार आहे. देशातील अनेक मोठ्या शहरात मोदींचे रोड शो केले आहेत. मोठ्या व्यक्तींच्या रोड शोला काही सुरक्षेच्या कारणास्तव उपायोजना कराव्या लागतात. विरोधकांच्या टिकेचा आमच्या विजयावर त्याचा काही परिणाम होणार नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले.
अजित पवार सध्या गायब असल्याची चर्चा होतेय. यावर शंभुराज देसाईंनी भाष्य केलंय. मी दौ-यावर आहे. त्यामुळे मी त्यांना भेटलो नाही. अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे की, पावसात भिजल्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली आहे. मी आज किंवा उद्या संपर्क करून माहिती घेतो, असं ते म्हणालेत.
आम्ही आमच्या उमेदवारांना त्या त्या मतादारसंघात जाहीरनामा द्यायला सांगितला आहे. आमच्या उमेदवारांनी तो जाहीर केला आहे. तुम्ही या लोकसभेत महाराष्ट्राला काही व्हिजन दिले आहे का? उद्योग, परकीय गुंतवणुक, शेती वर काही व्हिजन दिलं आहे का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांना केला आहे.