राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्यदिन कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसह साजरा केला. या ठिकाणच्या भगिनींकडूनच त्यांनी राखी बांधून घेतली. (सर्व फोटो : ट्विटर)
जात-धर्म विसरुन यावेळी रक्षाबंधन साजरं करण्यात आलं आणि मुस्लीम महिलांनीही शरद पवारांना राखी बांधली.
मुस्लीम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबातील भगिनी व बांधवांसह स्वातंत्र्यदिन पवारांनी साजरा केला.
पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवारांनी पूरग्रस्त भागातच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
शरद पवारांनी स्थानिकांशी संवादही साधला.
पूरग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत सरकारने जाहीर करावी, जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सरकारने करावा, स्थानिकांवर असलेले कर्ज माफ करण्यात यावे व व्यापारात जे काही नुकसान झाले त्याचीही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करावी लागणार असल्याचं शरद पवार म्हणाले.
कोल्हापूर येथील बापट कॅम्पमध्ये संत गोरा कुंभार वसाहतीत पूरग्रस्त झालेल्या समाजाला भेट दिली. या ठिकाणी गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात असून त्यांचेही नुकसान झालं आहे. आपद्ग्रस्तांच्या मागण्या प्रशासनाकडे तातडीने पोहचवण्याचं आश्वासन पवारांनी दिलं.
शरद पवार यांनी कोल्हापुरातील आंबेवाडी गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सर्व पक्षातील स्थानिक आमदारांनी पक्षपात बाजूला ठेवून सामाजिक जाणिवेतून पूरग्रस्तांच्या मदतीला उभे राहिलं पाहिजे. पुरामुळे गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत, असं शरद पवार म्हणाले.
अशा स्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यासंदर्भात सरकारकडे चर्चा करून पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासनही पवारांनी दिलं. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. विस्कटलेला संसार नव्याने उभा करू आणि या संकटाला धीराने तोंड देऊ, अशा शब्दात पवारांनी पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे शरद पवार दिवसभर पूरग्रस्त भागाचा दौरा करत लोकांमध्ये जात आहेत.
लोकात मिसळणारा नेता अशी ओळख असलेले शरद पवार पूरग्रस्तांना खचून जाऊ नये यासाठी आवाहन करत आहेत.
एखाद्या तरुण नेत्यालाही लाजवेल असा दौरा शरद पवार सध्या करत आहेत. शरद पवारांसारखा दिग्गज नेता भेटण्यासाठी आल्याने लोकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना निर्माण होत आहे.