अतिवृष्टीनंतर शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर अजितदादा बारामतीत

| Updated on: Oct 17, 2020 | 9:54 AM

यापूर्वी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. पवार यांनी तेथील परिस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. | Sharad Pawar in Marathwada

अतिवृष्टीनंतर शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर अजितदादा बारामतीत
Follow us on

बारामती: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ते मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. 18 ते 19 ऑक्टोबर या दोन दिवसांत शरद पवार मराठवाड्यात असतील. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. ( Sharad Pawar will visit Marathwada after heavy rain loss)

यापूर्वी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. पवार यांनी तेथील परिस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आतादेखील शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळीच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. पूर नेमका कशामुळे आला आणि आता काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दौऱ्यानंतर अजित पवारही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार का, हे पाहावे लागेल.

परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे प्रशांत बंब यांनी पत्रात म्हटले होते.


संबंधित बातम्या:

प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

सांगली, कोल्हापूरनंतर नंदूरबारही पाण्याखाली, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

( Sharad Pawar will visit Marathwada after heavy rain loss)