सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाला खड्डे मुक्त न केल्यास या रस्त्यावरील आनेवाडी टोलनाका तोडण्याचा इशारा दिला आहे (Shivendraraje Protest for Potholes free road). याबाबत त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजवण्याच्या सुचना केल्या आहेत.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोल नाक्यावर आज (18 डिसेंबर) आंदोलन झालं. मागील वर्ष भरापासून सातारा-पुणे महामार्गाची दुरावस्था झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टीमेटमही देण्यात दिला होता. मात्र. रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने अखेर शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट आनेवाडी टोलनाक्यावर मोर्चा नेला. भोसले समर्थकांनी यावेळी टोल वसुली बंद करत नाक्यावरील वाहने पैसे न घेता सोडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी वाहन चालकांना टोलनाक्यावर गुलाबाचे फुलही दिले.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे महामार्ग सोडला तर इतर रस्ते सुस्थितीत आहेत. मात्र आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असल्याची तक्रार सामान्य प्रवासी करत आहेत.
सातारा-पुणे महामार्गाबाबत आज झालेल्या टोल नाक्याच्या आंदोलनात शिवेंद्रराजे यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. यात त्यांनी महिनाअखेरीपर्यंत सातारा-पुणे रस्त्यावरील मुख्यरोड आणि सर्विस रोडवरील खड्डे बुजवणार असल्याचे लेखी आश्वासन घेतले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं शिवेंद्रराजे यांनी जाहीर केलं. यावेळी देखील हे आंदोलन स्थगित झाल्याने सातारकरांना आणखी किती दिवस खड्डे मुक्त महामार्गासाठी वाट पहावी लागणार हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.