मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Tweet) यांनी गुरुवारी (26 सप्टेंबर) एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. या ट्वीटमध्ये एका सापाचा फोटो आहे. ही सापाची नवी प्रजाती असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
Boiga thackerayi sp. nov – Thackeray’s cat snake, a new species with Tiger like stripes on it’s body from the Sahyadri tiger reserve in Maharashtra! pic.twitter.com/gkdKjOpih4
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 26, 2019
सापाच्या या प्रजातीचं नाव आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नावावरुन देण्यात आले आहे. या सापाच्या प्रजातीचा शोध घेण्यात तेजस ठाकरे यांनी लावला आहे (New Species Of Snake), त्यामुळे या सापाच्या प्रजातीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.
“125 वर्षांमध्ये पहिल्यांदा पश्चिम घाटात बोईगा प्रजाती आढळून आली. हे मुख्यकरुन झाडांवर राहाणारे बेडूक आणि त्यांची अंडी खाऊन जीवंत राहतात. हे जंगलात झाडांवर लटकलेले आढळतात. माझा भाऊ तेजसने या सापाच्या प्रजातीचा शोध लावला आहे, म्हणून याचं हे नाव ठेवण्यात आलं आहे”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं.
फाउंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटीचे डायरेक्टर डॉक्टर वरद गिरी यांच्यानुसार, ही नवी प्रजाती कॅट स्नेकच्या नावाने ओळखली जाते. या प्रजातीचा जीन बोईगापासून आला आहे. हा जीन संपूर्ण भारतात आढळतो, मात्र याच्या काही प्रजाती पश्चिम घाटात आढळतात.
तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने या प्रजातीचा शोध लावला आहे, म्हणून या प्रजातीला ठाकरे नाव देण्यात आलं आहे. या जीनचा शेवटचा साप हा 1894 मध्ये आढळला होता. हा लांबीला 3 फूट असतो आणि हे साप बिनविषारी असतात, अशी माहिती वरद गिरी यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वीच तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या दोन नव्या प्रजाती शोधून काढल्या होत्या. या पाली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळून आल्या. सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यात सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निमस्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटात सापडलेल्या प्रजातीला ‘निमस्पिस आंबा’, असं नाव देण्यात आलं.