औरंगाबाद : राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, ग्राम पंचायत निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. खेडोपाड्यांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या शिवसेनेनेही (ShivSena) ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबादमधील ग्रामपंचायंतींवर भगवा फडकवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी कंबर कसली आहे. त्यांनी सध्या गावागावात बैठका सुरु केल्या आहेत. (Shivsena leader Abdul Sattar trying to capture Gram Panchayats in Aurangabad)
औरंगाबाद जिल्ह्यातील 618 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायतींच्या राजकारणात उडी घेतली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या अनेक गावांमध्ये बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये त्यांचा संपर्क दौरा सुरु असून यादरम्यान यादाव्र विविध गावांमधील कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सुरु आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर दीपक केसरकर यांना भाजपचा जोरदार धक्का
दरम्यान, सिंधुदुर्गमधील आंबोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) तोंडावर माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. केसरकर यांचे खंदे समर्थक आणि आंबोली परिसरातील वजनदार नेते म्हणून परिचित असलेल्या दत्तू नार्वेकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत अनेक समर्थकांसह नार्वेकर यांनी काल (शनिवारी) भाजपमध्ये प्रवेश केला.
आंबोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन रनधुमाळीत दत्तू नार्वेकर यांनी भाजपमधे प्रवेश केल्यामुळे आंबोली परिसरात सेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दत्तू नार्वेकर यांच्यासोबत माजी सरपंच वैजयंती गावडे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गावडे यांच्यासह नार्वेकर यांच्या अनेक समर्थकांनी शनिवारी भाजपमधे प्रवेश केला आहे.
2020-21 च्या निवडणुकीत दोन बदल
2020-21 च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार, यात शंका नाही.
1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती
2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
एप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
(Shivsena leader Abdul Sattar trying to capture Gram Panchayats in Aurangabad)