मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली त्याचा समर्थन कोणीही करणार नाही, पण भाजपाचे भाडोत्री लोक जी भाषा वापरतात त्यांचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत का ? असा खडा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला. माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतल्यावर महाराष्ट्राचे संस्कृती लयाला गेली. आज मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे त्यांनी (फडणवीस)आपल्या लोकांना मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे द्यावेत, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
सरकारच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही टीका केली. भाजपाचे नेते नारायण तातू राणे आणि त्यांची मुलं कुठल्या प्रकारची भाषा वापरतात. भाजप आणि शिंदे यांची लोक कोणत्या प्रकारचे भाषा वापरतात. सरकारच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांनी आत्मचिंतन केलं तर मराठी भाषा आपोआप शुद्ध होईल, असेही ते म्हणाले.
इतकं दुभंगलेलं राज्य कधीच नव्हतं, हे भाजपचं राजकारण आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे, त्यावरून लोकं एकमेकांवर टीका करत आहेत. या मुद्यावरही संजय राऊत बोलले. राज्य कायद्याचं आहे . सरकारला वाटत असेल की एखाद्या नेत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा उल्लंघन होईल , तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे. पण ही वेळ कोणी आणली ? त्यांची फसगत झाली आहे असं आजही मराठा जनतेला का वाटतं ? त्यातून हा उद्रेक सुरू असेल तर ठीक आहे. गुन्हे दाखल होतात पण ही वेळ का आली ? जाती-जातीमध्ये आग लावण्याचा काम कोणी केलं ? असा सवाल राऊत यांनी विचारला. हे राज्य इतकं दुभंगलेलं कधीच नव्हतं , हे फडणवीस यांच्या काळात झालं . हे भाजपाचे राजकारण आहे असा आरोप राऊत यांनी केला.
भाजपाच्या स्वतःच्या कमरेवर चड्डी सुद्धा नाही
भारतीय जनता पक्षावर त्यांनी कडाडून टीका केली. भाजप हा संपलेलाच पक्ष आहे. भाजपला शिवसेना काँग्रेसचा ऑक्सिजन आहे भाजपा हा आयसीयू मधला पक्ष आहे. भाजपाच्या स्वतःच्या कमरेवर चड्डी सुद्धा नाही. ती सुद्धा दुसऱ्याची आहे. स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं.