तहसीलदार कार्यालयात जाळ्या, जळमटं, एक झाडू आमदाराच्या हातात दुसरा तहसीलदाराच्या

| Updated on: Jan 13, 2020 | 5:40 PM

तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून चक्क आमदारानेच हाती झाडू घेत कार्यालयाची साफसफाई केल्याचा अजब प्रकार नांदेडमध्ये घडला.

तहसीलदार कार्यालयात जाळ्या, जळमटं, एक झाडू आमदाराच्या हातात दुसरा तहसीलदाराच्या
Follow us on

नांदेड : तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून चक्क आमदारानेच हाती झाडू घेत कार्यालयाची साफसफाई केल्याचा अजब प्रकार नांदेडमध्ये घडला (Shivsena MLA Balaji Kalyankar). नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी आज (13 जानेवारी) तहसील कार्यालयाला भेट दिली. कार्यालयातील घाण आणि अस्वच्छता पाहून कल्याणकर चांगलेच संतापले. त्यांनी स्वत: हातात झाडू घेतला आणि तहसीलदारांच्या हातातही झाडू देत संपूर्ण कार्यालय स्वच्छ केले (Shivsena MLA Balaji Kalyankar).

शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आज नांदेडच्या तहसील कार्यालयाला भेट दिली. कल्याणकर तहसील कार्यालयात पोहोचताच तिथली अस्वच्छता पाहून संतापले. त्यांनी तातडीने दोन झाडू मागवले आणि एक झाडू स्वतः च्या हातात घेतला, दुसरा झाडू थेट तहसीलदारांच्या हातात दिला. कल्याणकर यांनी स्वत: कार्यालयात लागलेल्या जळमटं, जाळ्या काढल्या आणि तहसीलदारांनाही कार्यालय स्वच्छ करण्यास भाग पाडले.

तहसील कार्यालयात साफ सफाई करत आमदार कल्याणकर यांनी आपल्याला अशी घाण चालणार नसल्याचे तहसीलदारांना ठणकावले. “कार्यालय इतके घाण असेल, तर तुमच्या कार्यालयातील फाईलवर किती धूळ बसलेली असेल”, असा सवाल कल्याणकर यांनी तहसीलदारांना विचारला.

नगरसेवक ते आमदार असा प्रवास केलेल्या आमदार बालाजी कल्याणकर यांनी तहसील कार्यालयातील नेमक्या चुकीवर बोट ठेवल्याने कर्मचारी अवाक झाले. आमदार कल्याणकर बैठकीसाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

MLA Clean Tahsildar Office