मुंबई : अनेकदा बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दुकानांमध्ये वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा अधिक पैसे आकारुन ग्राहकांची लूट होते. मात्र, याबाबत कोठेही वाच्यता होत नाही. मात्र, मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळील अशाच एका दुकानदाराला चांगलाच धडा शिकवला आहे (Shopkeeper get 2 lac rupees penalty for charging extra). जाधव यांनी आईस्क्रिमसाठी छापिल किमतीपेक्षा (MRP) 10 रुपये अधिक घेणाऱ्या मुंबई सेंट्रल येथील शगून व्हेज रेस्टॉरन्टला थेट ग्राहक मंचात खेचलं. त्याच्या 6 वर्षांच्या सुनावणीनंतर आता या दुकानाला 2 लाख रुपयांचा दंड झाला आहे.
पोलीस अधिकारी भास्कर जाधव 8 जून 2014 रोजी घरी पाहुणे आल्याने आईस्क्रिम घेण्यासाठी रस्त्यात शगून रेस्टॉरन्ट येथे थांबले. तेथे त्यांनी काऊंटरवर क्वालिटी आईस्क्रिमचा फॅमिली पॅक घेतला. त्यावर आईस्क्रिमची छापिल किंमत 165 रुपये होती. मात्र, दुकानदाराने यासाठी तक्रारदार भास्कर जाधव यांना 175 रुपये आकारले.
ही बाब जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदाराने अनावधानाने अधिकचे पैसे आकारले असावेत असं समजून हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. मात्र, दुकानदाराने उर्मटपणे हे फ्रिजमध्ये ठेवल्याचे अतिरिक्त चार्जेस असल्याचे सांगून 10 रुपये परत करण्यास नकार दिला. तक्रारदारांनी अधिकचे पैसे घेणार असाल तर आईस्क्रिम परत घेऊन पैसे परत देण्यास सांगितले. मात्र, दुकानदाराने त्यालाही नकार दिला. अखेर तक्रारदार जाधव यांनी त्यांच्याकडून आईस्क्रिमसाठी 175 रुपये आकारल्याचे बिल घेतले.
संबंधित दुकान मुंबई सेंट्रल येथे रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाजवळ आहे. येथे दररोज हजारो लोक येऊन पुढील प्रवासासाठी जाण्याच्या घाईत वस्तू खरेदी करतात. मात्र, त्याचा गैरफायदा घेत या दुकानाने त्यांच्याकडूनही असेच अधिकचे पैसे आकारल्याचं भास्कर जाधव यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी याबाबत ग्राहक संरक्षण न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी वस्तूंच्या छापिल किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणाऱ्या दुकानाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर दुकानदारांनी देखील ग्राहक मंचात तक्रारदारांना 15000 रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तक्रारदार भास्कर जाधव यांनी याविरोधात राज्य आयोगाकडे दाद मागितली. राज्य आयोगाने या प्रकरणात दुकानदाराच्या तडजोडीला रद्द करत सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
अशाप्रकारे या प्रकरणी तब्बल 6 वर्षे सुनावणी चालून अखेर 20 ऑगस्ट 2020 रोजी ग्राहक मंचाने निकाल देत तक्रारदारांना मानसिक त्रास दिल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड, न्यायिक खर्चापोटी 5 हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले.
याशिवाय तक्रारदार पोलीस अधिकारी भास्कर जाधव यांनी आपल्या याचिकेत संबंधित दुकानदाराने अशाप्रकारे हजारो ग्राहकांची फसवणूक आणि लूट केल्याचा मुद्दा मंचाच्या लक्षात आणून दिला. तसेच ते इतर ग्राहक मंचापर्यंत पोहचू शकलेले नाही. मात्र, त्यांचाही त्रास आणि फसवणूक लक्षात घेऊन दोषी दुकानदाराला दंड म्हणून ग्राहक कल्याण निधीत 4 लाख रुपयांची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राहक मंचाने दुकानदाराला 2 लाख रुपयांचा ग्राहक कल्याण निधी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
दिशाभूल करणार्या जाहिरातींना चाप, खरेदीपूर्वीही तक्रार शक्य, सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू
उपवास सोडण्यासाठी झोमॅटोवरुन बटर पनीर मागवलं, पुण्यातल्या हॉटेलनं चिकन पाठवलं
Shopkeeper get 2 lac rupees penalty for charging extra