रत्नागिरी : गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात (Ratnagiri Special train for Ganeshotsav) आली. पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. काल (15 ऑगस्ट) कुर्ला टर्मिनलवरुन सुटलेली गणपती स्पेशल रेल्वे गाडी आज (16 ऑगस्ट) पहाटे रत्नागिरीत दाखल झाली. मात्र या रेल्वेमधून अवघे 11 प्रवासी रत्नागिरी स्थानकावर उतरले. तर सीएसएमटीवरुन रत्नागिरीत दाखल झालेल्या दुसऱ्या रेल्वेतूनही अवघे 16 प्रवासी उतरले.
कुर्ला टर्मिनसवरुन सुटलेली रेल्वे रत्नागिरी स्थानकात तब्बल पाऊण तास आगोदरच दाखल झालेली. काही प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणापत्र घेवून तर काहींनी स्वॅब टेस्ट करून या रेल्वेतून प्रवास केला. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेनं विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे. गणेशोत्सवात 182 रेल्वे फेऱ्यांचे नियोजन कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात गणेशोत्सवासाठी सीएसटीवरून सावंतवाडीला जाणारी दुसरी रेल्वे रत्नागिरीत दाखल झाली. या रेल्वेमध्ये सुद्धा अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले. दोन रेल्वेमधून अवघे 27 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले. केवळ दोन दिवस आधी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे चाकरमान्यांनी या रेल्वेला फारसा प्रतिसाद दिला नाही.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर सीएसटीवरून आलेली रेल्वे सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले.
“गणपती स्पेशल रेल्वेचे नियोजन आधी झाले असते, तर फार चांगले झाले असते. मुंबई गोवा महामार्गावरून फरफटत गेलेल्या चाकरमान्यांचे हाल थांबले असते अशा संतप्त प्रतिक्रिया कोकण रेल्वेंनी आलेल्या चाकरमान्यांनी नोंदवल्या आहेत.”
संबंधित बातम्या :
Ratnagiri | रत्नागिरीतील खारेपाटणच्या बाजारपेठा बंदच, गणेशोत्सवात व्यापाऱ्यांवर संक्रांत
Ratnagiri Corona | रत्नागिरीचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर, 5 डॉक्टरांचे राजीनामे