मुंबई : देशात अनेक राजघराणी अजूनही नांदत आहेत. जेव्हा 1948 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात 565 संस्थाने होती. मात्र, त्या संस्थानात एका महत्वाचे घराणे कुठेच नव्हते. हे घराणे म्हणजे भारतावर तब्बल 330 वर्षाहून अधिक काळ राज्य करणारे मुघल घराणे. महाराष्ट्रात पहायला गेल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्थापन झालेल्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही राजघराण्यांना अजूनही मान मिळत आहे. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर यांची राजघराणीही अजून टिकून आहेत. इंदोर, ग्वाल्हेर येथे त्यांची स्वतःची सत्ता आहे. त्यांना मानमरातब मिळत आहे. मुघलांनी उत्तर भारतात अनेक शहरे वसविली. लाल किल्ला, ताजमहाल सारख्या वास्तू त्यांनी उभ्या केल्या. मुघल घराण्याला एक प्रचंड मोठा असा इतिहास आहे. पण, त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत? ते काय करतात? त्यांची परिस्थिती कशी आहे? त्याचे कारण काय? हलाखीचे जीवन जगण्याची, कधी काळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या मुघल घराण्यातील वंशजांवर पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो यावरूनच त्या घराण्याची किती वाताहत झाली आहे याची कल्पना येते.
भारताच्या दिल्लीच्या गादीवर इब्राहिमखान लोदी याची सत्ता होती. 1526 साली मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील तुर्कस्थानचा सम्राट बाबर याने दिल्लीवर हल्ला केला. पानिपत येथे लोदी आणि बाबर यांचे अफाट सैन्य आमनेसामने आले. पानिपतच्या युद्धात बाबर याने इब्राहिम लोदी आणि त्याच्या अफगाण समर्थकांचा पराभव केला. या युद्धाने सल्तनत सत्तेचा शेवट झाला आणि भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला गेला. त्यानंतर 1527 मध्ये बाबरने राणा संगा आणि त्यांच्या समर्थकांचा खानूवा येथे पराभव केला. तर, 1528 मध्ये चंदेरी येथे राजपूतांचा पराभव करून त्याने संपूर्ण भारतावर आपली सत्ता गाजवून दिल्ली आणि आग्रा येथे मुघलांचे नियंत्रण स्थापित केले.
मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील आंदिजान या शहरात 14 फेब्रुवारी 1483 रोजी बाबर याचा जन्म झाला. तुर्क सम्राट तैमूरलंग याचा पाचवा वारस उमरशेख मिर्झा हे त्याचे वडील. तर आई कुल्लघ निगार खानुम ही मंगोलियन सम्राट चंगीझ खान याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा यांना एकूण तीन भाऊ आणि पाच बहिणी होत्या. त्यात जहिरुद्दीन हा सर्वात मोठा मुलगा होता. जहिरुद्दीन या किचकट नावामुळे त्याने आपले नाव बदलून बाबर असे केले. 1526 मध्ये त्याने दिल्ली काबीज केली. मात्र, त्यानंतर अवघ्या चार वर्षातच 26 डिसेंबर 1530 रोजी त्याचा मृत्यू झाला. बाबर याने तुर्की भाषेत तुझुक-ए-बाबरी हे आत्मचरित्र लिहिले आहे.
जहिरुद्दिन बाबर याला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्याने आपला 27 वर्षांचा मुलगा हुमायून याला आग्र्याला बोलावून घेतले. तो आग्र्याला पोहोचताच बाबर याने आपल्या सरदारांना हुमायून आपला वारस असेल असे जाहीर केले. त्यानंतर चार दिवसांनी बाबर याचा मृत्यू झाला आणि 30 डिसेंबर 1530 रोजी हुमायून भारताच्या सत्तेवर आला. बाबर याने हुमायून याला प्रजेची, भावांची काळजी घे. त्यांच्याशी दयाळूपणे वाग असा कानमंत्र दिला होता. वडिलांच्या इच्छेनुसार त्याने आपल्या मालमत्तेची वाटणी केली.
1531 साली जौनपूर येथील लढाईत हुमायून याने महमूद लोदीचा पराभव केला. 1534 मध्ये शेरशाह याची ताकद वाढत होती. त्याला पायबंद घालण्यासाठी हुमायून याने पूर्वेची मोहीम आखली. पण, ही मोहीम फसली. 1534 – 35 मध्ये त्याने माळवा, गुजरात जिंकले. त्यामुळे शेरशाह याची ताकद पूर्वीपेक्षा वाढली. शेरशाहवर नियंत्रण मिळवण्यासाठी हुमायूनने 1537 मध्ये पुन्हा पूर्वेची मोहीम आखली. शेरशाह याच्याविरोधात 7 जून 1539 साली चौसा येथे युद्ध झाले. त्यात झालेल्या पराभवामुळे हुमायूनला इराणला पळून जावे लागले. मे 1545 मध्ये युद्धादरम्यान झालेल्या एका स्फोटात शेरशाहचा मृत्यू झाला. शेरशाह नंतर सत्तेवर आलेल्या त्याच्या मुलाचा 1553 मध्ये मृत्यू झाला आणि 1555 मध्ये हुमायून याने इराणच्या सफाविद शाह याच्या मदतीने पुन्हा दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. दिल्लीचे तख्त पुन्हा काबीज केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच हुमायून याचा 22 फेब्रुवारी 1556 रोजी मृत्यु झाला. हुमायून महालाच्या पायऱ्या उतरत होता. दुसऱ्या पायरी उतरला त्याचवेळी शेजारच्या मशिदीतून ‘अल्ला हो अकबर’ अशी अजान ऐकू आली. तो आवाज कानावर पडताच हुमायून याने गुडघ्यात वाकून खाली बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाय अंगरख्यात अडकून तो पायऱ्यांवरून घसरला. डोक्याला खोल जखम झाली होती. उजव्या कानातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. यानंतर तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
वयाच्या 13 व्या वर्षी भारताचा सम्राट होणारा तैमुर याच्या राजवंशातील महाबली शहेनशाह अकबर हा तिसरा शासक. अकबर याचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून त्याचे नाव बदरुद्दीन मोहम्मद अकबर असे ठेवण्यात आले होते. बद्र म्हणजे पौर्णिमा आणि अकबर हे त्याचे आजोबा शेख अली अकबर जामी यांच्या नावावरून घेतले गेले. तर, अरबी भाषेत अकबर शब्दाचा अर्थ ‘महान’ किंवा ‘मोठा’ असा होतो. अकबर याला उत्तर आणि मध्य भारतातील सर्व क्षेत्रे नियंत्रणाखाली आणण्यासाठी दोन दशके लागली. संपूर्ण भारतीय उपखंडावर त्याचा प्रभाव होता. त्याने या प्रदेशाच्या मोठ्या क्षेत्रावर सम्राट म्हणून राज्य केले. अकबर याने शक्तिशाली आणि असंख्य हिंदू राजपूत राजांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. हिंदू – मुस्लिम पंथांमधील अंतर कमी करण्यासाठी त्याने दीन-ए-इलाही नावाचा धर्म स्थापन केला. त्याच्या दरबारात मुस्लिम सरदारांपेक्षा हिंदू सरदार जास्त होते. अकबर याने केवळ हिंदूंवर लादलेला जझिया रद्द केला नाही तर अशा अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघेही त्याचे प्रशंसक बनले होते.
अकबर याच्या राजवटीचा देशाच्या कला आणि संस्कृतीवर प्रभाव पडला होता. मुघल चित्रकला विकसित करण्याबरोबरच त्याने युरोपियन शैलीचेही स्वागत केले होते. अकबर याला साहित्यात रस होता. त्याच्याकडे अनेक संस्कृत आणि हिंदीमधील ग्रंथ फारसी आणि पर्शियन भाषेत संस्कृत अनुवादित केले होते. अकबर याच्या दरबारात अनेक हिंदू दरबारी, लष्करी अधिकारी आणि सामंत होते. त्यांनी मुस्लिम विद्वान जैन, शीख, हिंदू, चार्वाक, नास्तिक, ज्यू, पोर्तुगीज आणि कॅथोलिक ख्रिश्चन विद्वान यांच्याशी धार्मिक चर्चा आणि वादविवाद कार्यक्रमांची एक अनोखी मालिका सुरू केली होती. या सर्व धार्मिक नेत्यांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती. परंतु, अकबर याच्या मृत्यूने हा धर्म संपुष्टात आला. त्याच्या मृत्युनंतर अंत्यसंस्काराचे कोणतेही विधी न करता पार पडले. परंपरेनुसार, किल्ल्यात भिंत तोडून एक रस्ता तयार करण्यात आला आणि त्याचा मृतदेह पुरण्यात आला.
जहांगीर हा अकबर याचा मोठा मुलगा. मुराद आणि दानियाल हे त्याचे धाकटे भाऊ. मुराद आणि दानियाल यांचा वडिलांच्या हयातीतच दारू प्यायल्याने मृत्यू झाला होता. जहांगीर याचा 1585 मध्ये आमेरचा राजा भगवानदास यांची कन्या आणि मानसिंगची बहीण मानबाई हिच्याशी पहिला विवाह झाला. तर, दुसरा विवाह मारवाडचा राजा उदयसिंह यांची मुलगी जगतगोसाई हिच्याशी झाला. अकबर याचा मृत्यूनंतर सलीम याने नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर या उपनामाखाली मुघल सम्राट बनला.
सलीम याने आपल्या काळात कान, नाक आणि हात कापण्याची शिक्षा रद्द केली. मद्य आणि इतर मादक पदार्थांवर बंदी आणली. महत्त्वाच्या दिवशी जनावरांची कत्तल थांबवली. जहांगीर याच्याच काळात इंग्रज राजदूत सर ‘थॉमस रो’ हे भारतीय व्यापाराचे अधिकार आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आले होते. जहांगीरच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांत राजकुमार खुर्रम ( सम्राट शाहजहान) याने बंड केले. पण जहांगीरने हे बंड मोडून काढले. जहांगीर याला चित्रकला आणि कलेची खूप आवड होती. अफू आणि अल्कोहोल याच्या अतिसेवनामुळे तो शेवटच्या दिवसांत आजारी राहिला. 28 ऑक्टोबर 1627 रोजी तो काश्मीरहून परत येत असताना भीमवार येथे त्याचा मृत्यू झाला. लाहोरजवळ शाहदरा येथे रावी नदीच्या काठावर त्याला दफन करण्यात आले.
जहांगीर याचा 1627 मध्ये मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर खुर्रम आणि शहर्रयार या दोन वारसदारांमध्ये गादीवरून वाद निर्माण झाला. सरदार आसफखान याने खुर्रम याची तर नूरजहान हिने शहर्रयारचा पक्ष उचलून धरला. आसफखान याने दक्षिणेचा सुभेदार असलेला खुर्रम याला दक्षिणेतून आग्र्याला तातडीने पोहोचण्याचा संदेश दिला. खुर्रम आग्र्याला पोहोचण्यापूर्वी आसफखान याने शहर्रयारशी लढाई केली आणि त्याचा नि:पात करून आंधळे केले. त्यानंतर आग्रा येथे शाही इतमामाने शाहजहान याने 4 फेब्रुवारी 1628 रोजी सिंहासनाधिष्ठित झाला. मोगल सरदार आसफखान याची मुलगी मुमताजमहल हिच्याशी त्याचा विवाह झाला. जहाँआरा ही त्याची मोठी मुलगी, त्यानंतर त्याला दारा शुकोह, मुराद, शुजा, औरंगजेब अशी चार मुले झाली. दक्षिणेत सुभेदार असताना त्याने बालाघाट आणि निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले. त्यामुळे जहांगीरने त्याला शाहजहान ही पदवी दिली होती.
अकबर याचीच प्रशासन व्यवस्था शाहजहान याने किरकोळ फेरफार करून पुढे चालविली. रयतवारी पद्धतीऐवजी त्याने जमीनदारी पद्धत अंमलात आणली. अकबरा याच्या सिजदा (दंडवत प्रणाम) पद्धतीऐवजी तहार – तस्लिमची पद्धत रूढ झाली. त्याने सुन्नी पंथाचा पुरस्कार केला. मंदिरांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले आणि प्रजेवर पुन्हा तीर्थयात्राकर लादला होता. अल्लाबद्दल अपशब्द काढणे हा त्याच्या काळात दखलपात्र गुन्हा होता. सुलेखनकला, संगीत, चित्रकला, विशेषत: वास्तुकला यांना उत्तेजन दिल्यामुळे त्याने अनेक भव्य आणि मनोहर वास्तू उभारल्या. पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू ताजमहाल हे त्याचेच द्योतक आहे. आग्र्यातील दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, मोती मशीद, दिल्लीचा लाल किल्ला, जामा मशिदी यांच्या भव्य बांधकामाचे श्रेयही त्याच्याकडे जाते. संगमरवरी बांधकामात मौल्यवान रत्ने वापरून त्याने मोगल ऐश्वर्याचे दर्शन घडविले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने मोगल साम्राज्याची राजधानी आग्र्याहून दिल्ली येथे हलविली. अखेरच्या दिवसांत त्याला वारसायुद्धास तोंड द्यावे लागले. मोठा मुलगा दारा शुकोह याला गादी मिळावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याच्या मुराद, शुजा आणि औरंगजेब यांच्यात झालेल्या संघर्षात औरंगजेब यशस्वी झाला. औरंगजेब याने शाहजहान याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. कैदेत असताना आठ वर्षांनी त्याचा मृत्यू झाला.
शाहजहान आणि मुमताज यांचा औरंगजेब हा तिसरा मुलगा तर दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशहा. आपल्या मुराद, दारा, शुजा, सुलैमान, शुकोह यांचा काटा दूर केल्यानंतर जून 1659 मध्ये त्याचे राज्यारोहण झाले. त्याने स्वतःला आलमगीर ही पदवी दिली. औरंगजेब याच्या आयुष्याच्या सुरुवातीची 40 वर्षं मुघलांचा बादशहा होण्यासाठी खर्ची घालावी लागली. त्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यात गेली. दक्षिणेत सुभेदार असताना शहाजीराजे यांचा पराभव करून अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. 1657 मध्ये त्याने विजापूर आणि गोवळकोंडे राज्यांवर स्वाऱ्या केल्या. तसेच, दौलताबादपासून जवळच खडकी येथे औरंगाबाद शहर वसविले. औरंगजेब याला आपल्या कारकिर्दीत उत्तर भारतातील शीख, जाट, सतनामी, ईशान्येतील अहोम आणि दख्खनमध्ये मराठ्यांच्या बंडांचा सामना करावा लागला. सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षांचा सुवर्णकाळ भोगला, पण, आपलं राज्य वाढवण्यासाठी त्याला दक्षिणेत यावं लागलं. इथे 26 वर्ष त्याला तंबूत काढावी लागली. छ. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरही छ. शाहू यांना कैदेत ठेवणे, ताराराणी यांच्याशी संघर्ष आणि शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला.
औरंगजेब याचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला. आवडती सून 1705 साली मृत्युमुखी पडली. मुलगी झेबुन्निसा हिने आत्महत्या केली. त्याची बहीण गौरआरा 1706 साली निधन पावली. 1706 साली दुसरी मुलगी मेहरुन्निसा वारली. मग नातूही वारला. 1707 मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस आधी 2 नातू वारले. असे दुःख, एकटेपण, वैफल्य घेऊन अहमदनगरजवळ भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब याच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्याचा खऱ्या अर्थाने ऱ्हास सुरु झाला.
औरंगजेब याच्या मृत्यूनंतर भारतात मराठे, बुंदेले, शीख, राजपूत अशा नव्या सत्तांचा उदय झाला. त्या सर्वांनी मिळून मुघलांचे राज्य पोखरले. यात सर्वाधिक आक्रमक ठरले ते मराठे. 1760 मध्ये एकेकाळचे मुघल साम्राज्य फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहिले होते. संपूर्ण भारताचा ताबा मराठ्यांनी घेतला होता. शहा आलम दुसरा याला दिल्लीच्या गादीवर बसवून देशाचा कारभार मराठे हाकत होते. तरीही दिल्लीचा बादशहा हा मुघल घराण्याचाच होता. 1803 मध्ये मराठे आणि इंग्रज याच्यामध्ये दिल्लीत मोठी लढाई झाली. यात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळे आतापर्यंत मराठ्यांचा मांडलिक असलेला दिल्लीची बादशहा आता इंग्रजांचा मांडलिक झाला होता. शहा आलम दुसरा याचा 1806 मध्ये मृत्यू झाला आणि अकबर शहा दुसरा दिल्लीच्या गादीवर आला. त्याने 1837 पर्यंत राज्य केले. त्यानंतर 1837 साली बहादूर शहा जफर हा सम्राट म्हणून गादीवर आला. बहादूर शहा उतम गझला लिहित होता. तो उर्दू कवीही होता. 1857 पर्यंत त्याने राज्य केले. हाच बहादूर शहा जफर मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट ठरला.
इंग्रजांच्या विरोधात मराठ्यांनी 1857 साली उठाव केला. त्याचे नेतृत्व बहादूर शहा जफर याने केले. त्यावेळी त्याचे वय 82 वर्ष इतके होते. बहादूर शहा जाफर याने 1857 च्या उठावाचे नेतृत्व स्वीकारले. पण, ब्रिटीश कर्नल विल्यम हडसन याने हा उठाव मोडून काढला. इंग्रजांनी बहादूर शहा जफर याला कैद करून त्याची रवानगी म्यानमारमधील रंगून येथे केली. या उठावामुळे इंग्रज अधिकारी खूपच संतापले होते. कारण, त्यांच्या अस्तित्वासाठी हा मोठा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी त्याची दोन मुले मिर्झा खिज्र सुलतान, मिर्झा मुघल आणि नातू मिर्झा अबू बख्त यांची गोळ्या घालून हत्या केली.
बहादूर शहा जाफर याच्या काळात दिल्लीच्या लाल किल्यात शेकडो लोक रहात होते. ते सर्व मुघलांचे वंशज होते. कारण, औरंगजेब याच्या नंतर आलेल्या सर्वच मुघल बादशहा यांनी ऐशोआरामाचे जगणे पसंद केले होते. नाच-गाणे, खाणे-पिणे यातच त्यांचा अधिक जात होता. अनेक बादशाह यांनी अनेक पत्नी केल्या होत्या. त्यांच्यापासून त्यांना अनेक मुले देखील झाली होती. बहादूर शहा जफर यालाही 22 मुले होती. ते सर्व स्वतःला पुढचा बादशहा मानू लागले होते. बहादूर शहा जफर याचा 1862 साली मृत्यू झाला. मात्र, बहादूर शहा जफर याच्या नेतृत्वामुळे मुघल सत्ताधीश भारतीय जनतेला भडकावीत असल्याचा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी जाफर याच्या मुलांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्यास सुरवात केली. त्याचे राहते घर लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे हे सर्व वंशज रस्त्यावर आले. इंग्रजांकडून होणारी धरपकड टाळण्यासाठी मुघलांचे वंशज वाट मिळेल तिकडे आपला संसार घेऊन पळू लागले.
लाल किल्यातून बाहेर पडले मुघलांचे वंशज वाट मिळेल तिकडे जाऊ लागले. त्यातील काही जणांनी काश्मीर गाठले. काही जण हैद्राबाद, लखनऊ, पंजाब अशा प्रांतात पळून गेले. तेथे जाऊन त्यांनी सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास सुरवात केली. आपली ओळख त्यांनी जगापासून लपवून ठेवली. कारण, जर आपली ओळख सांगितली तर इंग्रज आपल्याला शोधून काढतील आणि आपल्याला ठार करतील याची त्यांना भीती वाटत होती. याच भातीने त्यांनी पुढील काही पिढ्या सामान्य लोकांप्रमाणे जीवन जगत काढल्या. मोल मजुरी करून ते आपले जीवन जगू लागले. दरम्यान, इंग्रजांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला. जाता जाता इंग्रजांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. त्यामुळे मुघल घराण्यातील काही जणांनी पाकिस्तान गाठले. तर काही जणांनी कोलकत्याचा मार्ग धरला.
बहादूर शहा जफर याचा नातू जमशेज बख्त याचा मुलगा मिर्झा मोहम्मद बेदार बख्त याचा 1980 साली मृत्यू झाला. याच मिर्झा मोहम्मद बेदार बख्त याची पत्नी सुलताना बेगम या सध्या कोलकाता येथे आपल्या 5 मुली आणि 1 मुलगा याच्यासह झोपडीत रहात आहेत. याच सुलताना बेगम यांनी तत्कालीन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहून विनंती केली होती. त्यामुळे राष्ट्रपती यांना सुलताना बेगम यांना सहा हजार रुपये पेन्शन मंजूर केली. सध्या या पेन्शनवरच त्यांची गुजरान सुरु आहे. मात्र त्याची एक वेगळी मागणी आहे. लाल किल्ला आणि ताज महाल या सारख्या मुघलांनी बांधलेल्या वास्तू सरकारने आपल्या ताब्यात द्याव्यात अशी भोळी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हैद्राबाद येथे लैला उमाहाणी या आपल्या दोन मुलांसह रहात आहेत. बहादूर शहा जफर यांचा नातू मिर्झा प्यारे यांच्या त्या कन्या आहेत. याकुब मैनुद्दीन टू सी हे त्यांच्या पतीचे नाव. याकुब आणि लैला यांना दोन पुत्र आहेत. त्यातील मोठा मुलगा झियाउद्दीन टू सी हे सरकारी कार्यालयात नोकरी करत आहेत. तर दुसरा मुलगा मसुहुद्दिन हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत आहे. मुघलांच्या या वंशजांना स्वतंत्र भारतात आता महत्वाचे स्थान हवे आहे. त्यांना मुघलांच्या अनेक प्रोपर्टीमध्ये आपला वाटा हवा आहे. पाकिस्तानमध्येही इम्रान खान नावाचे मुघलांचे आणखी एक वंशज आहेत. भारतात अनेक अशी राजघराणी आहेत की ज्यांनी इंग्रज गेल्यानंतरही आपल्या राजघराण्याचे अस्तित्व टिकवून ठेवले. ज्या सरदार, नवाब यांनी कधी काळी मुघलांकडे चाकरी केली त्याच सरदार आणि नवाबांची घराणी अजूनही उत्तर भारतामध्ये आपले नवाबी जीवन जगत आहेत. त्यांनीही या मुघलांची कधी बाजू घेतली नाही. कारण, त्या त्या वेळच्या मुघल सम्राट यांनी जनतेकडे लक्ष देण्याऐवजी ऐशोआरामात जीवन जगण्यास पसंती दिली होती. त्यातही 1857 च्या उठावातील बहादूर शहा जफर याचा सहभाग हे मुघलांच्या ऱ्हासाचे मूळ कारण आहे.