वर्धा : मुंबईहून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यात आलेली सायन येथील परिचारिका आणि तिच्या पतीवर होम क्वारंटाईनचे नियम मोडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कोरोनाचा संसर्ग पसरविल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sion Hospital nurse corona positive at Wardha)
सावंगी मेघे येथील परिचारिका मुंबई येथून 16 मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली. तिने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही. मुंबईहून वर्ध्यात आल्याची कुणालाही माहिती दिली नाही. शिवाय आरोग्य तपासणी सुद्धा करुन घेतली नाही. 21 मे रोजी आरोग्य विभागाने संपूर्ण कुटुंबाला गृह विलागीकरण केले.
यानंतरही तिचे पती गावात इतरत्र फिरत होते. संबंधित महिला मंगळवारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच महिलेच्या पतीने कुणाच्याही संपर्कात न आल्याची खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोडल अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिचारिका आणि पती विरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिचारिकेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. परिचारिकेच्या पतीसह संपर्कातील लोकांची चाचणी घेण्यात आली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पतीचा सलून व्यवसाय असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
Sion Hospital nurse corona positive at Wardha
संबंधित बातम्या