मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासोबत सोमवारी ‘इंडियन न्यूट्रिशन अॅग्रीकल्चरल फंड’ची सुरुवात केली. सर्व प्रकारचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कुपोषणावर नियंत्रण ठेवणे हे या फंडचं उद्दीष्ट आहे.
या कार्यक्रमानंतर स्मृती इराणी यांनी बिल गेट्ससोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला (Smriti Irani Insta Post). हा फोटो शेअर करताना स्मृती इराणी यांनी या फोटोला एक मजेशीर कॅप्शन दिलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर स्मृती इराणींच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलं जात आहे.
‘शिक्षण पूर्ण केलं नाही, विचार सुरु आहे पुढे काय करायचं’, असं कॅप्शन स्मृती इराणी यांनी या फोटोला दिलं.
या फोटोचं कॅप्शन पाहताच स्मृती इराणींच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला. अनेकांनी स्मृती इराणींच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. स्मृती इराणी यांची प्रसिद्ध मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ बनवणाऱ्या निर्माती एकता कपूरनेही स्मृती इराणींच्या पोस्टवर कमेंट केली. ‘बॉस, तुलसी अजुनही लक्षात आहे, प्लीज परत या’अशी कमेंट एकता कपूरने केली. त्यावर ‘देश सेवा पहिले मॅडम’, असं उत्तर स्मृती इराणींनी दिलं.
स्मृती इराणी आणि बिल गेट्स या दोघांनीही शिक्षण पूर्ण केलेलं नाही. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. तर बिल गेट्स यांनीही शिक्षण अर्ध्यावर सोडलं आहे. त्यांनी हावर्ड विद्यापिठात दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॉलेज सोडलं. त्यानंतर ते जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती ठरले.