अबब! या शाळेत विद्यार्थ्यांना चक्क साप पकडण्याचं प्रशिक्षण

| Updated on: Jul 07, 2019 | 5:07 PM

मुलांना पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त हस्तकला, चित्रकला, कचऱ्यातून कला, निरनिराळे खेळ इत्यादी गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. मात्र, कोल्हापुरातील एका शाळेत मुलांना चक्क साप हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

अबब! या शाळेत विद्यार्थ्यांना चक्क साप पकडण्याचं प्रशिक्षण
Follow us on

कोल्हापूर : मुलांच्या सर्वांगांचा विकास व्हावा यासाठी अनेक शाळा वेगवेगळे उपक्रम चालवत असतात. मुलांमधील आवडीनिवडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. मुलांना पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त हस्तकला, चित्रकला, कचऱ्यातून कला, निरनिराळे खेळ इत्यादी गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. मात्र, कोल्हापुरातील एका शाळेत मुलांना चक्क साप हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

हे ऐकूण तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल. मात्र, हे खरं आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय आहे. याचं शाळेत मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच सापांना हाताळणं शिकवलं जातं.

1966 मध्ये स्वर्गीय बाबूराव टिकेकर यांनी सरकारी नोकरी सोडून सापांच्या संवर्धानाचा ध्यास धरला. त्यातूनच या विद्यालयाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागात आजही सापांविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या दूर करण्यासाठी टिकेकरांनी अनेक प्रयत्न केले. ही शाळा देशातीलच नाही, तर जगातील पहिली सर्पशाळा आहे.

शाळेला लागूनच ही सर्पशाळा आहे. या सर्पशाळेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी हे सर्प मित्र होऊन बाहेर पडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार अधिकृत असलेल्या या शाळेतील विद्यार्थी अगदी सहजपणे सापांना हाताळतात. त्यांना कशाचीही भिती वाटत नाही. जसे इतर विद्यार्थी खिशाला पेन लावून शाळेत येतात, तसे हे विद्यार्थी खिशात साप घेऊन येतात. पाचव्या वर्गापासून पुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जातं. विशेष म्हणजे या मुलांकडे विषारी साप हाताळण्यासाठी दिले जात नाहीत.

ग्रामीण भागात पावलो-पावली शेतकरी आणि सापांची भेट होत असते. शेतात काम करताना अनेक वेळा त्यांचं दर्शन होतं. त्यावेळी या शाळेतील शिक्षकांना बोलवण्यात येतं. त्यानंतर शिक्षक त्या ठिकाणी जाऊन हे साप पकडतात आणि त्यांना शाळेत आणलं जातं. या शाळेत 79 साप ठेवण्याची परवानगी आहे.

या सर्पशाळेत विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप आहेत. विद्यार्थ्यांना या सापांबद्दल पूर्णपणे माहिती दिली जाते. विषारी साप कसे ओळखायचे, बिनविषारी साप कसे ओळखायचे, सापानं दंश केल्यास प्राथमिक उपचार काय करायचे, असं सगळं ज्ञान त्यांना दिलं जातं.

ही शाळा खऱ्या अर्थानं या पृथ्वीवरील सजीवांचं चक्र सांभाळण्याचं काम करते. या शाळेतील शिक्षक सापांचं महत्व नागरिकांना, शेतकऱ्यांना पटवून देतात. त्यामुळे आता अनेक शेतकरी साप विषारी असेल तरच शिक्षकांना बोलावतात आणि बिनविषारी असेल तर तो शेतातच ठेवून घेतात. दरवर्षी शेकडो विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडतात आणि सापांचं संवर्धन करण्याचं काम करतात.

ही सर्पशाळा सुरु ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. टिकेकर सरांनी सुरु केलेली ही शाळा तानाजी वाघमारे यांनी नेटानं पुढे नेली. इथले शिक्षक पदरमोड करुन ही शाळा चालवतात. सापांचा सांभाळ करणे, त्यांचं खाद्य हे सर्व येथील शिक्षकच करतात. त्यामुळे सध्या हे शिक्षक सरकारी मदतीची अपेक्षा करत आहेत.

VIDEO :