अहमदनगर : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेतील शाळेनेही घवघवीत यश मिळवलं (Snehalay School SSC result Hina Shaikh). स्नेहालयच्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यांचं हे यश अनेक कारणांनी विशेष आणि महत्वाचं मानलं जातंय. कारण ही सर्व मुलं एकतर आजारपणाशी तरी झुंज देत आहेत किंवा सामाजिक स्तरावरील पोकळीचा तरी सामना करत आहेत. विशेष म्हणजे याच शाळेतील एका विद्यार्थीनीने कॅन्सर सारखा दुर्धर आणि जीवघेणा आजार झालेला असतानाही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दहावीत 71 टक्के गुण मिळवले. तिने स्नेहालयच्या शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
हिना शेख या विद्यार्थीनीने कॅन्सर झालेला असतानाही आपल्या शिक्षणाचा निर्धार पूर्ण केला आहे. तिचं दहावीचं संपूर्ण वर्ष दवाखान्यात उपचारात आणि आजाराच्या वेदनेतच निघून गेलं. तरीही हिनाने जिद्द न सोडता अभ्यास सुरुच ठेवला आणि 71 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीरण केली. हिनाने शाळेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. निकास जाहीर झाला तेव्हाही ती हॉस्पिटलमध्येच कॅन्सरशी झुंज देत होती.
हिनाच्या चेहऱ्यावर कॅन्सरच्या वेदना नाहीतर शिक्षणाचं समाधान
निकालानंतर हिना म्हणाली, “मला परीक्षा काळात त्रास होत होता, तरीही मी अभ्यास केला. मला केवळ 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवायचे होते. त्यासाठी मी शक्य होईल तसा अभ्यास करत राहिले. आता दहावीचा हा निकाल पाहून खूप आनंद होत आहे.” निकालानंतर हिनाच्या चेहऱ्यावर कॅन्सर आणि त्याच्या उपचाराच्या वेदना कोठेच दिसत नव्हत्या. होतं ते केवळ आपल्या कष्टाचं सार्थक झाल्याची भावना आणि दहावीच्या यशाचा आनंद.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
घर नाही, आजारांची बाधा, दुहेरी लढाईतही मुलांचं शैक्षणिक यश
अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेत आपलं घर लहानपणीच गमावलेली अनेक मुलं आपल्या जगण्याच्या दिशा शोधत राहतात. त्यातील अनेकांना दुर्दैवाने काही आजारांची बाधा झाल्याने दुहेरी लढाई लढावी लागते. मात्र, अशाही स्थितीत स्नेहालयातील या मुलांनी आपल्या शिक्षणाचा निर्धार पूर्ण केला आहे. स्नेहालयातील दहावीची ही पहिलीच तुकडी आहे. या पहिल्याच तुकडीतील सर्व 17 विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. याबद्दल स्नेहालयच्या पदाधिकाऱ्यांपासून सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.
स्नेहालयातील पुरब गुरवने 76 टक्के मिळवून शाळेतून पहिलं क्रमांक पटकवलाय, तर निलेश जवळकरने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॅन्सरशी निकराने झुंज देणारी हिना शेख आहे.
“हिनाने फक्त बोर्डाच्या परीक्षेत नाही, तर आयुष्याच्या लढाईत बाजी मारली”
हिनाच्या या उत्तुंग यशाबद्दल बोलताना स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले की “हिनाने फक्त बोर्डाच्या परीक्षेत नाही, तर आयुष्याच्या लढाईत बाजी मारली आहे.” विशेष म्हणजे गिरीश कुलकर्णी यांनी या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वोवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन (VOPA) या संस्थेच्या मदतीने मागील वर्षभरात शैक्षणिक उपक्रम देखील राबवले. त्याचाही या मुलांच्या यशावर सकारात्मक परिणाम झाल्याचं मत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
हिनाच्या आणि एकूणच स्नेहालय शाळेच्या निकालाबाबत वोपाच्या संचालक ऋतुजा सीमा मेहंद्र यांनी सांगितलं, “अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेची ही मुलं खूप विशेष आहेत. अगदी जन्मापासून ही मुलं कितीतरी मानसिक, शारीरिक त्रासातून जात असतात. एवढ्या लहान वयात त्यांना कितीतरी संकटांना तोंड द्यावं लागतं. या संकटांना तोंड देत या मुलांनी यशाच्या शिखरावर आपली मजल मारत आम्हाला सुद्धा आश्चर्यचकित केलं आहे.”
परीक्षेच्या दिवशीही दवाखान्यात, मात्र हिनानं जिद्द सोडली नाही
“काल दहावीचा निकाल लागल्यावर हिना शेख या मुलीबद्दल समजलं. मागील कित्येक वर्षांपासून हिना कितीतरी वेगवेगळ्या आजारांना तोंड देत आहे. अगदी 10 वीचं वर्ष सुद्धा तिने दवाखाना आणि शाळा असंच काढलं. तिची शारीरिक अवस्था इतकी बिकट होती की तिला बोर्डाची परीक्षा देता येईल की नाही अशी परिस्थिती होती. पण मला परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं असा पक्का निर्धार तिने केला. पण संकटांनी तिची साथ सोडली नाही. ऐन पेपर द्यायच्या दिवशीही तिला दवाखान्यात न्याव लागलं. यानंतही हिनाने जिद्द न सोडता रायटरची मदत घेऊन परीक्षा दिली आणि हे यश मिळवलं,” असंही ऋतुजा सीमा महेंद्र यांनी सांगितलं.
परीक्षा देताना हिनाला बसणंही कठीण होत होतं, तरीही तिने सर्व पेपर दिले. यात हिनाचे काळजी वाहक, तिचे शिक्षक आणि स्नेहालयातील अनेक कार्यकर्ते यांची तिला साथ मिळाली.
स्नेहालय संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे अनाथ, एचआयव्ही बाधित, रेड लाईट एरियातील मुले शिक्षण घेतात. यंदा येथील दहावीची पहिलीच बॅच होती. त्यामुळे सर्व संस्थेचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन करुन सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला. या सर्वांनीच आपल्या वाट्याला आलेल्या आव्हानांचा विचार न करता दहावीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांना मिळालेल्या यशामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं आहे. सर्वच स्तरातून या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जातंय. कोणताही आधार नसताना या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश इतरांसाठी आदर्श असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत
राज्यात शिक्षणाचा नवा “बीड पॅटर्न”, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण
Snehalay School SSC result Hina Shaikh