केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सकारात्मक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सरसकट तीन लाखांची कर्जमाफी करावी अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असून या सभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ मिळ शकते का असा प्रस्ताव आम्ही मांडला असल्याचे पणन आणि अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळावी याबद्दल सकारात्मक आहे. केंद्र सरकार जोपर्यंत याबद्दल निर्णय घेणार नाही तोपर्यंत यामध्ये काही निर्णय होणार नाही असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी कंपन्यांनी जास्त कठोर अटी लावल्या आहेत. त्या रद्द करण्यात याव्यात आणि एक रुपया पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा. त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी जर शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळून जातील असेही मंत्री सत्तार यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते सरसकट कर्जमाफीबद्दल पुढाकार घेऊ शकतात. सरकारने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या, त्यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ देखील फायद्याची ठरणार असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.
आंदोलन करणे किंवा उपोषण करणे हा मनोज जारंगे पाटील यांचा अधिकार आहे, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री लक्ष ठेऊन आहेत. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मला भेटीसाठी वेळ दिल्यास आपण त्यांची नक्की भेट घेऊ आणि त्यांच्यासोबत चर्चा करु. त्यांची मागणी वैयक्तिक नसून समाजासाठी आहे आणि मराठा बांधवांना न्याय मिळावा ही माझी देखील प्रामाणिक भावना आहे असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
मराठा समाज आपला मोठा भाऊ आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती बिकट आहे , त्यामुळे जरांगे त्यांच्यासाठी लढत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ओबीसी आणि मराठा बांधवांची हक्काची लढाई सुरू आहे, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वच समजतं का? असं छगन भुजबळ म्हणाले होते, मात्र मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. विशाळ गडावर जो प्रकार झाला त्याची चौकशी व्हायला पाहिजे, आपण आपली धार्मिक स्थळे जपून ठेवली पाहिजेत. जातीय अस्थिरता निर्माण होणार नाही याची दक्षता संभाजी राजे आणि इम्तियाज जलील यांनी घ्यायला हवी अशी माझी त्यांना विनंती असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे महंतांनी उद्धव ठाकरे यांची जखम पाहिली असावी. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी कायम त्यांच्या सोबत आहे. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. ज्यादिवशी मला जायचं असेल त्या दिवशी मी त्यांना सॅल्यूट करून जाईल. मी बोलता शिवसैनिक नाही तर प्रासंगिक करारावर आलेला एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेना जॉईन केली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1 ऑगस्टला खात्यावर पडले आणि विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून येईल आणि पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असेही सत्तार यांनी म्हटले आहे.