सोलापूर : सोलापुरात मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस वेगळ्याच पद्धतीने धडा शिकवत आहेत. मास्क नसलेल्या वाहनचालकांना चक्क शर्ट काढून तोंडाला बांधण्यास सांगत आहेत. (Solapur Police Shirt Corona Mask) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतर पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत.
आवाहन करुनही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी ही अनोखी शक्कल शोधून काढली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागातही पोलिसांकडून अतिशय प्रभावीपणे होताना दिसत आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असं वारंवार बजावून सांगितलं जात आहे.
ग्रामीण भागातील लोक विनाकारण बाहेर पडताना दिसत असल्याने पोलिसांनी आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला आहे. मोहोळ तालुक्यातील कामती चौकामध्ये मास्क नसलेल्या वाहनधारकांना पोलिसांकडून शर्ट काढायला लावून तो तोंडाला बांधण्यासाठी सांगितलं जात आहे. (Solapur Police Shirt Corona Mask)
तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधणाऱ्या लोकांची चांगलीच फजिती होत आहे. आवाहन न पाळणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांना ही क्रिएटिव्हीटी शोधून काढावी लागली.
सोलापूरचे क्रिएटिव्ह पोलिस! मास्क न घालणाऱ्यांना शर्ट काढून तोंडाला बांधण्याची शिक्षा pic.twitter.com/NtGSacWEAs
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2020
‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.
दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात चापोली येथे लाठीचार्ज करुन करुन पोलिसांचे हात दुखत असल्याने पोलिसांनी एका मुख्याध्यापकांनाच लाठीचार्ज करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दत्ता कुलकर्णी असं या मुख्याध्यापकांचं नाव आहे. ते चापोली येथील स्वामी विवेकानंत विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. तर सुभाष हरणे असं संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
(Solapur Police Shirt Corona Mask)