सोलापूर : मुंबईतील बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. भगवान गावडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गावडे हे सोलापुरातील मंगळवेढा आगारात वाहक म्हणून काम करत होते. (Solapur ST Worker died due to not getting treatment)
मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी गेले होते. काही दिवसांपूर्वी ते सर्व कर्मचारी सोलापुरात परतले. यानंतर मंगळवेढा आगारातील वाहक भगवान गावडे यांना मूळव्याधीचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली.
त्यामुळे वाहतूक नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना उपचार मिळावा यासाठी वारंवार तक्रार केली होती. मात्र त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने भगवान गावडे यांचा कुर्ला येथील रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान भगवान गावडे यांच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.
सोलापुरातील 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना
मुंबईतील रस्त्यावर प्रवाशांची कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमांमध्ये एसटीच्या 1000 गाड्या सेवेत आहेत. यात सोलापूर विभागातील वाहक सुद्धा मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाले आहेत. मुंबईत बेस्ट बसची सेवा दिल्यानंतर ते सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी पुन्हा सोलापुरात परतले. त्यानंतर त्यातील काही जणांना ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
या चाचणीत तब्बल 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यातच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत बेस्टच्या दिमतीला आलेल्या सोलापुरातील 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, उपचार सुरू
सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा