पुणे : काही विद्यार्थी परीक्षा फी भरु शकले नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांचे संपूर्ण निकालच अडवले (Pune Student result) आहेत. परदवीचे शेकडो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Student result).
काही विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न महाविद्यालय प्रशासनाने उपस्थित केला आहे. विद्यापिठाच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शवली आहे.
विद्यापीठाने पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कोरोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे. त्याचदरम्यान करोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून निकाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाही, असं सांगितलं जात आहे.
विद्यापीठाने परीक्षा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ज्या महविद्यालयात जास्त आहे, अशा महाविद्यालयांचे निकाल राखीव ठेवले आहेत. विशेषत: काही विषय राहिले आहेत, अशा बॅकलॉग विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याचे प्रमाण जास्त आहे.
“विद्यापीठाने निकाल राखीव ठेवल्याने महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 18 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. जवळपास 60 लाख रुपये परीक्षा शुल्क प्रलंबित असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे यांनी दिली.”
संबंधित बातम्या :
घरात दुसरा मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा, पुणे झेडपीचा भन्नाट उपक्रम
ऑनलाईन शिक्षण उपक्रम चांगला, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहतील : विवेक पंडित