मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचं (Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi) 724 वं वर्ष आहे. ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi) वारकऱ्यांच्या दिंड्या देहू आळंदी-पंढरपूर मार्गावर दिसत आहेत. मात्र याच मार्गावर दिवेघाटात आज एक भीषण दुर्घटना घडली. ब्रेक फेल झालेला एक जेसीबी थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला आणि घात झाला. संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले.
ज्ञानोबांची संजीवन समाधी आणि संत नामदेवांचं नातं
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचं हे 724वं वर्ष. ज्ञानोबा माऊली आणि संत नामदेव यांच्या वयात बरंच अंतर असलं तरी त्यांची मनं मात्र जोडली गेली होती. विठ्ठल नामाचा ध्यास आणि भक्तांमधील विठ्ठल प्रेम वाढीस लागावं, आणि मानवी जीवन सुखाचं व्हावं यासाठी या दोन्ही संतांनी एकत्रित येत अनेक प्रयत्न केले. मात्र संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा प्रसंग म्हणजे प्रत्येकाच्या काळजावर दगड होता. पण तरीही तो क्षण ‘सोहळाच’ आहे याची जाणीव नामदेवांना होती. नेमका हा सोहळा कधीपासूनचा आणि नामदेव महाराजांनी त्याचं स्वरुप कसं ठेवलं याचा हा आढावा –
इ.स. 1296 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्व संतसमागम आणि ज्ञानोबांच्या भावंडांच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र ज्ञानोबा म्हणजे कोणी सर्वसामान्य जन नाही हे सर्व संत, त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई आणि संत नामदेवही जाणून होते. सर्वेश्वराचा मानवी अवतार म्हणजे ज्ञानोबा. त्यांना मृत्यूनं स्पर्श करणं शक्यच नाही. पण जर संजीवन रुपातच आपल्यामधे राहून, माऊली भक्तांचा उद्धार करु इच्छितात तर त्यांना रोखणारे आपण कोण, हे जाणूनच संजीवन समधीसाठीची तयारी सुरु झाली.
आदी, तीर्थावळी आणि समाधी अशी तीन, नामदेवरायांच्या गाथेतील प्रकरणं आहेत. ज्यात या ज्ञानोबा आणि तिन्ही भावंडांच्या चरित्राचं वर्णन सापडतं. याच प्रकरणात असा उल्लेख आहे की, नामदेव महाराजांच्या मुलांनी समाधी स्थळाची सिद्धता केली.
पण हे करत असताना नामदेवांनाही गहिवरून येत होतं. आपल्याहून ज्ञाना वयाने लहान असला तरी कर्तृत्वनं मोठाच. ईश्वर भक्ती आणि सद्गुरू प्रेमाची चुणूक दाखवणारे ज्ञानोबा म्हणजे नामदेवांचे परमप्रीय मित्र.. मात्र आता आपला मित्र आपल्यासोबत प्रत्यक्ष भेटीसाठी नाही या भावनेनं नामदेव म्हणतात-
‘नारायण त्राहे त्राहे ॥ कृपादृष्टी तूरे पाहे ॥ मी व्याकुळ होतआहे ॥ ज्ञान देवाकारणे’
नामदेव महाराजांच्या अभंगातून ज्ञानोबांचे गुरू आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ, तसंच नामदेवांचे गुरू विसोबा खेचर आणि नामदेवाचे चार पुत्र नारा-विठा-गोंदा-महादा यांचाही व्यतीत झाल्याचा उल्लेख झाला आहे.
पुंडलिके मिठी निवृत्तिच्या गळा, अवघियांच्या डोळा आसुवें येतीं ।।
विठोबाचं हृदय आलेंसे भरून, झांकियेले नयन निवृत्तिराजे
दीर्घ ध्वनि करी। नारा विठा।। गोंदा आणि महादा,
सांडिती शरीर विसोबा खेचर । फार कष्टी।।
लोपलासे भानु, पडला अंधार।, गेला योगेश्वर। निवृत्तिराज।
ज्ञानोबांच्या अशा समाधीस्त होण्यानं सर्वचजण हेलावले मात्र हा माऊलींचा निर्णय समाज कल्याणाचाच हेही सर्वजण जाणून होते. त्यामुळेच स्वतः नामदेव महाराज पंढरपुरातून आपल्या चारही लेकरांसहीत हरिनामाचा जयघोष करत आळंदीत दाखल झाले. आजतागायत ती परंपरा कायम आहे. म्हणजेच ही परंपरा 724 वर्षांची आहे. जी नामदेव महाराजांची सतरावी पिढीसुद्धा जपतेय. आज या सोहळ्याला जाताना दुर्घटना घडली खरी मात्र येत्या काळातही जगदोद्धारासाठी ज्ञानोबा माऊलींने घेतलेल्या संजीवन समाधीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी नामदेवांच्या पुढच्या अनेक पिढ्या आळंदीत येत राहणार इतकं निश्चित.