कोलंबो : ईस्टरच्या दिवशीच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने आता काही महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत. हल्ल्याचा तपास करताना तपास यंत्रणांना या घटनेमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून आलाय. रविवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 500 जण जखमी आहेत.
या हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकार आता बुरख्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे. डेली मिररने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार मस्जिद अधिकाऱ्यांशी बोलून या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे वळण्याची शक्यता आहे. सोमवारी अनेक मंत्र्यांनी याबाबतीत राष्ट्रपती मैत्रीपाल सीरिसेना यांच्याशीही चर्चा केली.
1990 च्या सुरुवातीला खाडी युद्धापर्यंत श्रीलंकेत महिलांच्या वेशभूषेत बुरख्याचा समावेश नव्हता. खाडी युद्धाच्या वेळी मुस्लीम महिलांसाठी बुरख्याची परंपरा सुरु झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, डेमाटागोडा घटनेत सहभागी असलेल्या अनेक महिला बुरखा घालून पळून गेल्या. दहशतवाद्यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी किंवा स्फोटकं लपवण्यासाठी बुरख्याचा वापर करु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केलेले आहेत. श्रीलंकेचाही याच देशांच्या रांगेत समावेश होऊ शकतो.
चाड, कॅमरुन, गाबोन, मोरक्को, ऑस्ट्रिया, बल्जेरिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम आणि उत्तर पश्चिम चीनमधील मुस्लीमबहुल प्रांत शिनजियांगमध्ये बुरख्यावर बंदी आहे. आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने बुरख्यावर बंदी घातली आहे.