जळगाव : दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी पहिलाच पेपर फुटला (SSC paper leak). दहावीचा मराठीचा पेपर फुटला. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर (SSC paper leak) फुटला. धक्कादायक म्हणजे फुटलेला पेपर कॉपीबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर पोहोचला.
याप्रकाराने शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केराची टोपली मिळाल्याचं दिसतंय. तर केंद्रप्रमुख हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.
तालुक्यातील एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांना सुळसुळाट आहे. आपल्या शाळेचा निकाल जास्त लागावा आणि शाळेचे नाव मोठे व्हावे यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचा आरोप आहे.
काही शिक्षकांचे पाल्य दहावीची परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेमका हा पेपर कुणी फोडला, कुंपणच शेत खातंय का असे प्रश्न आहेत.
दहावीची परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. (Maharashtra Board SSC Exam Updates)
यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.
संबंधित बातम्या
ऑल द बेस्ट! ‘दहावीची लढाई’ सुुरु, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला