जळगाव : भरधाव कार एसटी बसवर आदळून भीषण अपघात (Jalgaon car accident) घडला आहे. या अपघातात एका कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जळगावातील पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले चौधरी कुटुंबीय हे धुळे येथील रहिवासी होते. नातेवाईकांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना चौधरी कुटुंबियांवर काळाने झडप घातली.
संजय चौधरी (52), मिनल संजय चौधरी (24) आणि सरला रवींद्र चौधरी (65) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. तर नीता संजय चौधरी (47), रवींद्र चौधरी (67) आणि विवान चौधरी (4) या तीन व्यक्ती जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंबियांच्या एका नातेवाईकाचा रविवारी साखरपुडा होता. हा कार्यक्रम आटोपून चौधरी कुटुंबीय आपल्या कारने घरी परत येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर विचखेडे गावाजवळ त्यांची कार धुळ्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या शिर्डी-भुसावळ या एसटी बसवर आदळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी (Jalgaon car accident) झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. बसच्या समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर विचखेडे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले.
दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु (Jalgaon car accident) होते.