मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनीही संपाचा इशारा दिलाय. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत.
मान्य केलेल्या 4849 कोटींचं वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आलाय. याशिवाय एसटी महामंडळाचं शासनात विलिनीकरण करण्याचीही मागणी आहे. रक्कम मंजूर करुनही सरकारने वेतन करारावर स्वाक्षरी केली नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय.
कामगारांना किमान 32 टक्के ते 48 टक्के वेतन वाढ मिळेल असं जाहीर केलं होतं. मात्र त्यानुसार वेतन मिळत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी सध्या मॅरेथॉन बैठका करत असलेल्या राज्य सरकारची चिंता आणखी वाढली आहे.
गेल्या वर्षात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेकदा संप केला. ऐन दिवाळीच्या तोंडावरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीची घोषणा केली. पण या वेतनवाढीचा लाभ अजून मिळाला नसल्याचं कामगार संघटनेचं म्हणणं आहे.