अमरावती: पासबूक अपडेट करण्याची विनंती करणाऱ्या वृद्ध महिलेचं पासबूक फाडून कॅशिअरने तिच्याच तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. अमरावतीत हा प्रकार घडला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील रमाबाई वरघट या स्टेट बँकेत गेल्या होत्या. त्यांनी कॅशिअरला पासबूक भरुन देण्याची विनंती केली. मात्र कॅशिअरने पासबूक फाडून तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे कॅशिअरचं निलंबन करण्याची मागणी होत आहे.
पण कॅशिअरने थेट पासबूक का फाडलं? त्याला इतका राग का आला? संबंधित महिला त्याला काही बोलली का हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान, याप्रकारानंतर वृध्देने तळेगाव पोलीस स्टेशनला याबाबत लेखी तक्रार दिली आहे.
रमाबाई वरघट यांचे स्टेट बँकेच्या घुईखेड शाखेत बचत खाते आहे. या खात्यामध्ये त्यांना एका सरकारी योजनेचे पैसे येत असल्यामुळे, त्या पैसे आले की नाही याची खात्री करण्याकरिता घुईखेड स्टेट बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.
यापूर्वी सुध्दा याच कॅशिअरच्या अनेक तक्रारी आल्या. परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हा कॅशिअर विनाकारण बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या शाखेत कॅशिअरची हिटलरशाही सुरु असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.