मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनात दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. पण कर्जमाफीसाठी किती निधी लागेल. त्याचबरोबर किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल याची आकडेवारी समोर आली नव्हती. पण स्टेट बँकेच्या (SBI Study on farmer loan waiver) अभ्यासातून हा आकडा समोर आाल आहे.
दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 45 ते 51 हजार कोटी लागतील. 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. भाजप-शिवसेना सरकारप्रमाणं अटी शर्थी लावल्या तरी 45 हजार कोटींची गरज लागेल. तसेच सरसकट कर्जमाफी दिल्यास 51 हजार कोटींचा भार येईल, असं स्टेट बँकेच्या (SBI Study on farmer loan waiver) अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं पैशांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. एकीकडे सरकार समोर निधीची जुळवाजुळव करण्याचं आव्हान आहे. तर केंद्राकडेही राज्य सरकारचा पैसा अडकलेला आहे.
विविध करांपोटी राज्य सरकारला केंद्राकडून 45 हजार 77 कोटी रुपये येणे बाकी आहेत. चालू आर्थिक वर्षातही राज्याचं बजेट 43 हजार कोटींच्या तोट्यात गेलं आहे. म्हणजेच खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला, तर राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, असं म्हणता येणार आहे. त्यामुळं कर्जमाफीसाठी सध्या तरी कर्ज काढण्याचा पर्याय ठाकरे सरकारसमोर असल्याचं दिसत आहे.