मुंबई: दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने मोठा दिलासा दिला आहे. (State government announce ST will not increase fares in Diwali)
राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळानं ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
कोरोनाच्या संकटामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं दोन महिन्यांचं वेतन थकीत आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. प्रलंबित वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा
प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या
State government announce ST will not increase fares in Diwali