पुणे: राज्यातील तरुणांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट कारगिल विजयदिनी म्हणजेच 26 जुलैला सकाळी 10 वाजता दाखवण्यात येईल.
राज्य सरकारने राज्यातील चित्रपटगृहांना 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजताचा एक शो मोफत दाखवण्यास सांगितले आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुण याचा लाभ घेऊ शकणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटगृहाचे चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासोबत नियोजनासाठी बैठक घ्यावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.
#कारगिल विजयदिनी, २६ जुलै रोजी सकाळी १० वा. राज्यातील सर्व चित्रपटगृहांत ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत दाखविणार. युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना,अभिमान वृद्धिंगत व्हावा याकरीता हा चित्रपट दाखविणार -माजी सैनिक कल्याण मंत्री @sambhajipatil77 यांची घोषणा pic.twitter.com/cozHF6NzNf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2019
उरी चित्रपट मोफत दाखवण्यामागे तरुणांमध्ये भारतीय सैन्याबद्दल अभिमान आणि आदर वाढावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने ‘हाउज द जोश’ ही घोषणाही प्रसिद्ध केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहापासून संसदेपर्यंत ही घोषणा गाजली. या चित्रपटानेच विकी कौशलची लोकप्रियता प्रचंड वाढली. दहशतवाद्यांकडून भारतावर होणारे हल्ले आणि त्यावर भारतीय सैन्याने घेतलेली आक्रमक भूमिका याला केंद्रभागी ठेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला होता. याला देशभरातून प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिली होता.