बेंगळुरू | 20 मार्च 2024 : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी वादग्रस्त विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे अडचणीत आल्या आहेत. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाबाबत दावा करताना मंत्री शोभा करंदलाजे यांनी तामिळनाडूतील एका व्यक्तीने बॉम्ब पेरला होता असा दावा केला होता. त्यांच्या याच विधानावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत 48 तासांच्या आत कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. त्यावरून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केलेल्या दाव्याची चर्चा सुरु झाली होती. मंत्री शोभा करंदलाजे यांनी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब तामिळनाडूतील एका व्यक्तीने पेरला होता असा दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी बेंगळुरूमध्ये अजान दरम्यान हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल एका व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी सिद्धरामय्या सरकारवरही निशाणा साधला होता.
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी, ‘एक व्यक्ती तामिळनाडूतून आला. त्याने कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला. दुसरे एक दिल्लीहून येतात विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देतात. तिसरा केरळमधून येतो आणि कॉलेज तरुणीवर ॲसिड ओततो. अशी टीका सिद्धरामय्या सरकारवर केली होती.
मंत्री शोभा करंदलाजे यांच्या याच विधानावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. एम. के. स्टॅलिन यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत, ‘मी भाजपच्या केंद्रीय मंत्री शोभा यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. असे दावे करण्यासाठी एकतर एनआयए अधिकारी असणे आवश्यक आहे किंवा रामेश्वरम कॅफे स्फोटाशी जवळचे संबंध असणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री यांना स्पष्टपणे असे दावे करण्याचा अधिकार नाही. तमिळ आणि कन्नड समाजातील लोक भाजपच्या या फुटीरतावादी वक्तव्याला नाकारतील.’ असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्री शोभा करंदलाजे यांच्याविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली. शोभा करंदलाजे यांच्यावर 48 तासांच्या आत कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना दिले आहेत. मंत्री शोभा यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करा आणि त्याचा अहवाल 48 तासात केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवा, असे निर्देशही दिले आहेत.