न्यूयॉर्क: भारतीय वंशाच्या गीतांजली राव हिने (Gitanjali Rao) टाईम मासिकाचा ‘किड ऑफ द इयर’ हा मानाचा किताब मिळवला आहे. गीतांजली ही शास्त्रज्ञ असून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा तिचे कौतुक झाले आहे. ‘किड ऑफ द इयर’ ठरल्याने सध्या सोशल मीडियावर अवघ्या 15 वर्षांच्या गीतांजली राव हिची प्रचंड चर्चा सुरु आहे. (Time Kid of the Year Gitanjali Rao aims to solve world’s problems)
‘टाईम’ मासिकाकडून यावर्षीपासून ‘किड ऑफ द इयर’ पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे. या पुरस्कारासाठी जवळपास 5000 जण स्पर्धेत होते. मात्र, या सगळ्यांवर मात करत गीतांजलीने या पुरस्कारावर नाव कोरले. तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली होती.
गीतांजली राव हिने आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.
गीतांजली राव हिच्या नावाची घोषणा करताना टाईम मासिकाने म्हटले आहे की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
गीतांजली राव हिच्यावर सध्या सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गीतांजलीने आपल्या या यशाचे श्रेय पालक आणि शिक्षकांना दिले आहे. जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल. प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा, असा संदेश तिने तरुणांना दिला.
गीतांजली राव ही अमेरिकेतल्या लोन ट्री, कोलोरॅडो राज्यातली 15 वर्षांची मुलगी आहे. यापूर्वी तिला डिस्कव्हरी एज्युकेशन एम ३ यंग सायंटिस्ट चॅलेंज पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यामुळे गीतांजलीला अमेरिकेतल्या सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर तिला तीन महिने कामाची संधी मिळाली होती.
गीतांजलीने मध्यंतरी पाण्यातील शिसे शोधून काढण्याचे यंत्र विकसित केले होते. पाण्यामधील शिसे शोधण्याच्या पद्धतीवर जगभर प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण गीतांजलीने शोधलेली पद्धत सोपी तर आहेच, पण कमी खर्चात होणारी असल्याने जगभर कुठेही त्याचा सहज वापर शक्य आहे. तिच्या या शोधाचे प्रचंड कौतुकही झाले होते.
इतर बातम्या:
अरेव्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान
दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ‘ड्रॉ’मध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले
भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट, संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत आदर पुनावालांचे भाषण दाखवले जाणार
(Time Kid of the Year Gitanjali Rao aims to solve world’s problems)