राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्यापासून शरद पवार कुटुंबातील लोकांनी फारकत घेतली आहे. अजितदादांना अनेक ठिकाणी पुन्हा काकांकडे जाणार का ? अशी देखील विचारणा झाली आहे. परंतू अजितदादांनी आता आपण खूप पुढे निघून गेलो आहोत. आता महायुतीच्या सोबतच एकत्र निवडणूका लढविणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजितदादांनी आपण लोकसभा बारामती निवडणूकीत घरातील व्यक्तीला उभे करायला नको होते असेही वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकारणात कधी कुटुंब आणू नये असे आपण या घटनेनंतर शिकल्याचे त्यांनी म्हटले होते. अजितदादा यांची बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनी आता अजितदादांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही. दीड दोन महिन्याचा विषय आहे आपलंच सरकार येणार आहे. जो कोणी पालकमंत्री होईल तो विरोधी पक्षाचा पण मान सन्मान ठेवेल. लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालेल असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
जिथे जिथे काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे तिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गुंजभर जास्तच काम करेल. हा शब्द मी देते असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. आपण सगळे एकत्र काम करतोय, खरी लढाई ही निवडणुकीनंतर आहे 40, 45 दिवसांवर निवडणूक आली आहे. आपलं सरकार आल्यावर मुख्यमंत्री पहिला निर्णय हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्याचा घेतील, मुंबईत सिनेटच्या दहाच्या दहा जागा युवा सेनेने जिंकल्या. त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला असे त्या यावेळी म्हणाल्या.
राऊत साहेब म्हणाले की ईव्हीएम नव्हतं म्हणून सिनेट दहाच्या दहा जागा आल्या, पण, यातील गमतीचा भाग सोडा, आपण सगळे ईव्हीएमने निवडून आलो आहोत. कधी कधी अशी एखादी कॉमेंट आली तर जास्त मनाला लावून घ्यायच नसतं असेही सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केलेले आहे.