अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली. सामान्य लोकांपासून ते राजकीय मंडळी, शिवप्रेमी सगळेच यावर संताप व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी याबाबत आवाज उठवला आहे. शिवरायांच्या पुतळ्याबाबत एवढा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो?, असा सवाल महाविकास आघाडीकडून केला जात आहे. अशातच झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्यानेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार दिवेश मेडगे याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. यात त्याने एक पोस्टर शेअर केलंय. यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समर्थकांना देत आहेत, असं हे पोस्टर आहे. यातून अत्यंत मार्मिक शब्दात शिवरायांचा पुतळा कोसळण्यावर भाष्य करण्यात आलं आहे. तुम्हाला हे कधी कळणार नाही, मी पुतळ्यात नाही…. गडकिल्ल्यांमध्ये आहे! निष्ठा ‘हिरोजींच्या’ बांधकामासारखी भक्कम असते. हे लक्षात ठेव ‘महाराष्ट्रा’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. दिवेशने शेअर केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. डिसेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पण उद्घाटनानंतर आठ महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून सध्या महारहाष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळताच याचे सर्वच स्तरावर पडसाद उमटले. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरलं. जिथं हा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीने आंदोलन केलं. तर 1 सप्टेंबरला मुंबईतही आंदोलन केलं जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं अमोल कोल्हे म्हणाले.