मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) असलेल्या टीम इंडियासमोर खेळाडूंच्या दुखापतींमुळे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र या कसोटीदरम्यान भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे उमेश यादव (Umesh Yadav) तिसर्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात पदार्पण करणारा डावखुरा गोलंदाज टी. नटराजनला (T Natarajan) तिसर्या कसोटीत संधी मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ट्विटरद्वारे याबाबतची माहिती जाहीर केली आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे. (T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad says BCCI)
नशीब फळफळलं
खरंतर थंगारासू नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची टी-20 सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. मात्र चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या जागी थंगारासूला संधी मिळाली. तर थंगारासूला काही दिवसांपूर्वीच बॅकअप खेळाडू म्हणून संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता कसोटी मालिकेसाठीही नटराजनची निवड झाली नव्हती. मात्र उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने नटराजनला तिसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आहे.
आयपीएलनंतर एकदिवसी आणि टी-20 मालिकेत जबरदस्त कामगिरी
यॉर्कर किंग नटराजनने एकदिवसीय पदार्पण सामन्यात 70 धावा देत 2 बळी घेतले होते. त्यानंतर त्याला टी-20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 बळी घेत सर्वांची मनं जिंकली होती. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने नटराजनला संधी दिली आहे. दरम्यान, दुसर्या कसोटी सामन्यात जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आघाडीचा फलंदाज शुभमन गिलने पदार्पण करुन सर्वांना प्रभावित केले आहे.
थंगारासूची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी
थंगारासू आयपीएलच्या 13 व्या मोसमात हैदराबादकडून एकूण 16 सामने खेळला. यामध्ये त्याने एकूण 16 विकेट्स घेतल्या. थंगारासूनं आयपीएलमध्ये एबीला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं. तेव्हापासून थंगारासू चांगलाच चर्चेत आला. यंदाच्या आयपीएलमध्ये नटराजने सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.
शार्दुलची संधी हुकली
दुखापतग्रस्त उमेश यादवला आता रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. त्यामुळे तो भारताकडे रवाना झाला आहे. दरम्यान, टी. नटराजन याने आयपीएलमधील आणि नुकत्याच झालेल्या एकदिवसीय तसेच टी-20 मालिकेतील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, परंतु त्याने तामिळनाडूतर्फे केवळ एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी कशी असेल, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे उमेशच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी मिळेल असे म्हटले जात होते. कारण शार्दुल मुंबईतर्फे सातत्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळेल असे बोलले जात होते.
हेही वाचा
इंजिन स्टार्ट, रोहित शर्माची सिडनी कसोटीसाठी तयारी सुरु!
आयत्या बिळावर नागोबा, रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेचं मेलबर्न कसोटी विजयाचं क्रेडिट हिरावलं?
(T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad says BCCI)