मुंबई: सब टीव्हीवरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला मोठा धक्का बसणार आहे. कारण ‘टप्पू की मम्मी’ आणि ‘सोसायटी की जान’ अर्थात ‘दया बेन’फेम अभिनेत्री दिशा वकानी या पुन्हा एकदा या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दिशा वकानी या 2017 साली मेटर्निटी लिव्हवर गेली होती. आता तर त्यांनी मालिकेलाच राम राम ठोकलं आहे.
30 नोव्हेंबर 2017 रोजी दिशा वकानी यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर दिशा वकानी या मालिकेत परततील, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, दिशा वकानी यांनी मार्च 2018 पर्यंत आपली सुट्टी वाढवली आहे. मध्यंतरी काही सीन दिशा वकानी यांच्या घरी जाऊन शूट करण्यात आले. मात्र, ते तितके सोईचे नव्हते. त्यामुळे आधीचे काही सीन फिलर म्हणून वापरण्यात आले. मात्र, आता सर्वच अडचणीचे होऊन बसले आहे. वारंवार घरी जाऊन शूट करणं शक्य नाही. निर्मात्यांनी दिशा वकानी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिशा वकानी मालिकेत परततील अशी काही चिन्हं दिसत नाहीत.
स्पॉटबॉय मासिकाच्या वृत्तानुसार, दिशा वकानी यांनी निर्मात्यांसमोर आपला वेळ आणि पैशांसंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या, ज्या निर्मात्यांनी मानल्या नाहीत. त्यामुळे अखेर दिशा वकानी यांच्यासोबतचा करार संपवण्यात आला. असेही म्हटले जाते आहे की, दिशा वकानी यांच्या मालिकेत नसण्याने टीआरपीवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे मालिकेतून त्यांच्या एक्झिटमुळे निर्मात्यांनाही काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे.