मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका गेल्या अकरा वर्षांपासून प्रेक्षकांचं अव्याहतपणे मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालाल, बापूजी अशा या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखांना प्रेक्षकांच्या मनात स्थान आहे. वयोवृद्ध बापूजींची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अमित भट्ट (Amit Bhatt) प्रत्यक्षात खूपच वेगळे दिसतात. अमित भट्ट यांचा आज (12 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीची ओळख करुन घेऊयात.
‘बर्थ डे बॉय’ अमित भट्ट यांनी वयाची 47 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांनी ‘तारक मेहता…’ या मालिकेत भूमिका साकारायला सुरुवात केली, तेव्हा ते अवघे 36 वर्षांचे होते. त्यावेळी अमित यांच्यासमोर दुप्पट वयाची व्यक्तिरेखा साकारण्याचं आवाहन होतं. परंतु त्यांनी लीलया पेललं आणि प्रेक्षकांना कायम हसत-खिदळत ठेवलं. तेव्हापासून अमित भट्ट बापूजींची भूमिका अक्षरशः जगत आले आहेत.
हलक्या फुलक्या नर्मविनोदी घटनांमधून जीवनाचा सार साध्या-सोप्या भाषेत सांगणारी मालिका म्हणून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. तारक मेहता.. या मालिकेने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे. या यशामध्ये मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा समान वाटा आहे.
अमित भट्ट यांनी गुजराती चित्रपटांमधून कामाला सुरुवात केली. यापूर्वी यस बॉस, फनीफॅमिली.कॉम, एफआयआर यासारख्या मालिकांमध्ये झळकले आहेत. मात्र त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती बापूजींच्या भूमिकेने. पण आश्चर्याची गोष्टी ही, की ज्या व्यक्तिरेखेमुळे ते लोकप्रिय झाले, तिचा गेटअप नसेल, तर त्यांना कोणी ओळखणारही नाही. अमित भट्ट यांना विदाऊट मेकअप ओळखणारे प्रेक्षक फारच कमी आहेत.
रिअल लाईफमध्ये अमित अत्यंत रोमँटिक असल्याचं त्यांची पत्नी सांगते. अमित भट्ट यांना जुळे मुलगे आहेत. त्यांना फिरण्याची आवड असून अमित यांनी सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. नुकतीच त्यांनी सलमान खानच्या ‘लव्हयात्री’ चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.