नवी दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात ‘तब्लिग जमात’तर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’चं प्रसारकेंद्र झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून जमाती सहभागी झाले होते. ‘तब्लिग जमात’मध्ये उपस्थित राहिलेल्या जमातीपैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षण दिसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. हे जमाती आपापल्या राज्यात परतल्यामुळे ‘कोरोना’ मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. (Tablighi Jamaat Nizamuddin Markaz becomes Corona Hotspot)
‘तब्लिग जमात’च्या कार्यक्रमात 5 हजार जमाती सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी 2 हजार 137 सहभागींची ओळख पटली आहे, तर इतरांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत 1203 जमातींच्या ‘कोरोना’ चाचण्या घेण्यात आल्या असून 24 जण ‘कोरोना’ग्रस्त असल्याचं आढळलं आहे. जे जमाती या कार्यक्रमात सहभागी होते, त्यांनी स्वत: पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
दिल्ली पोलिसांनी निजामुद्दीनमधला हा पूर्ण भाग सील केला आहे, ज्यामध्ये ‘तब्लिग जमात’च्या मुख्य केंद्राचाही समावेश आहे. निजामुद्दीनमधील मरकज प्रकरणी मौलाना साद, डॉ. झीशान, मुफ्ती शेहजाद, एम सैफी, युनूस आणि मोहम्मद सलमान यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकांना जमा करणे आणि जमावबंदीचा नियम तोडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. निजामुद्दीनमधील मरकज रिकामे करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पाच दिवसाचा वेळ लागला. आज सकाळी 4:30 च्या सुमारास सर्व मरकज रिकामे झाले आहे. 2300 पेक्षा जास्त लोकांना यामधून बाहेर काढले आहे. पूर्वपरवानगीशिवाय लोक इथे मोठ्या प्रमाणावर जमल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
महाराष्ट्रातील किती आणि कुठले भाविक?
निझामुद्दीन परिसरातला ‘तब्लिग जमात’चा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल 136 जण ‘तब्लिग जमात’ला गेले होते. औरंगाबादमधून 47, तर कोल्हापुरातून 21 जमाती सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर, नांदेड, ठाणे, सातारा, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील भाविक सहभागी झाल्याचं समोर येत आहे. ‘तब्लिग जमात’ हे देशातील ‘कोरोना’चं मोठं हॉटस्पॉट असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
अहमदनगरमध्ये पाच कोरोनाग्रास्तांपैकी दोन परदेशी रुग्ण हे ‘तब्लिग जमात’चे सहभागी आहेत. तर अन्य 3 पॉझिटिव रुग्ण हे सहभागींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत. (Tablighi Jamaat Nizamuddin Markaz becomes Corona Hotspot)
‘तब्लिग जमात’मध्ये महाराष्ट्रातून कुठून किती जमाती?
पुणे, पिंपरी चिंचवड – 136
नागपूर – 54
औरंगाबाद– 47
अहमदनगर – 34 (29 परदेशी नागरिक)
कोल्हापूर – 21
नवी मुंबई – 17
सोलापूर – 17
नाशिक – 15
मुंब्रा (ठाणे)- 14
नांदेड – 13
यवतमाळ – 12
सातारा – 7
चंद्रपूर – 7
उस्मानाबाद – 6
सांगली – 3
वर्धा – 1
एकूण – 404
याआधीच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जम्मू काश्मीरमधील 65 वर्षीय नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यानंतर याची पाळंमुळं समोर येऊ लागली. तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगालमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध उघड होऊ लागले.
तब्लिग जमात म्हणजे नेमकं काय?
‘तब्लिग जमात’ ही एक धार्मिक संस्था आहे. 1920 पासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची ‘मरकज’ म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरु असतो. प्रत्येक ‘इज्तेमा’चा ठराविक दिवसांचा कालावधी चालतो.
‘कोरोना संसर्ग’ झालेले रुग्ण सापडत असल्याच्या बातम्या येत असतानाही निजामुद्दीनमधील ‘मरकज’मध्ये ‘इज्तेमा’ सुरु होता. यावेळी इतर राज्यामधील जमाती ये-जा करत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात अनेक ठिकाणी अशा आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, तरी दिल्लीतील कार्यक्रम सुरुच राहिला.
‘तब्लिग जमात’चं म्हणणं काय?
‘तब्लिग जमात’ च्या कार्यक्रमाच्या तारखा वर्षभरापूर्वीच निश्चित झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केल्यानंतर ‘तब्लिग जमात’नेही आपला कार्यक्रम तातडीने रद्द केला. देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच काही राज्यांनी रेल्वे आणि बस सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेक जमाती परत जाऊ शकले नाहीत आणि ते इथेच अडकून पडले, असं ‘तब्लिग जमात’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Delhi: Nizamuddin Markaz and the area around it being sanitised by South Delhi Municipal Corporation. A religious gathering was held in Nizamuddin Markaz, that violated lockdown conditions&several #COVID19 positive cases have been found among those who attended the gathering. pic.twitter.com/KpQFZWd7tL
— ANI (@ANI) April 1, 2020