मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior trailer) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन (Tanhaji: The Unsung Warrior trailer) केलं आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान आहे. तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे.
काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या सिनेमात सोबत काम केले होते. अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमाचं पोस्टर नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी शेअर केलं होतं.
तानाजी मालुसरे कोण होते ?
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात.
कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.