सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जलदगती गोलंदाज उमेश यादवदेखील मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याला नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची साथ मिळाली. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने आता जसप्रीत बुमराहदेखील चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. टीम इंडियासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत. चौथ्या कसोटीत नवदीप सैनी आणि सिराजसोबत शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा या नवोदित गोलंदाजांवर असणार आहे. (Team India will play Fourth test without Jasprit Bumrah and Umesh-Shami-Ishant; Big Question about Indian Pace attack)
जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बुमराह जगातील सध्याच्या घडीचा सर्वश्रेष्ट गोलंदाज आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत नवख्या गोलंदाजांना सोबत घेऊन त्याने भारतीय जलदगती गोलंदाजीची धुरा चोखपणे सांभाळली. आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक डावात कांगारुंना जखडून ठेवले. परंतु आता बुमराहदेखील नसेल तर भारतीय गोलंदाजी कमकुवत होणार आहे. सिराज, सैनी हे टी-20 मधील उत्तम गोलंदाज असले तरी त्यांना कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे शेवटचा कसोटी सामना जिंकणं भारतीय संघासाठी खूप कठीण असणार आहे.
बुमराहची दुखापत गंभीर
PTI ने BCCI मधील सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे की, बुमराह ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. पोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. BCCI मधील सूत्रांनी सांगितले की, बुमराहला झालेली दुखापत गंभीर आहे. त्याच्या पोटाचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वजण या स्कॅन रिपोर्टची वाट पाहात आहेत. बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. तो फिट असणं संघासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच ऑस्ट्रेलियानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज व्हायचं आहे. त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुखापतींची ‘कसोटी मालिका’
दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर सरावादरम्यान स्टार फलंदाज के. एल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला भारतात परतावे लागले आहे. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाल्याने चौथा कसोटी सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे, तर हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. दोघांनाही आता रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. तसेच या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन जखमी झाले आहेत. पुढील सामन्यात हे दोघे खेळतील अथवा नाही, याबाबत शंका आहे. तसेच या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया संपवून नुकताच तो भारतीय संघात सहभागी झाला आहे.
संबंधित बातम्या:
भारताला अजून एक धक्का, जाडेजानंतर हनुमा विहारी चौथ्या टेस्टला मुकणार
Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला
Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ
‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव
तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…
(Team India will play Fourth test without Jasprit Bumrah and Umesh-Shami-Ishant; Big Question about Indian Pace attack)