नवी मुंबई : ठाणे कारागृहाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल 23 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीच्या विरोधात कामोठे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दामप्त्याने तळोजा कारागृहात एपीआय असल्याची बतावणी केल्याचंही यात समोर आलं आहे. (Thane police file Fraud case against couple)
भास्कर चिचुलकर यांनी याबाबतची तक्रार केली आहे. ते केंद्रीय डायरेक्टर जनरल ऑफिस येथून सेक्शन ऑफिसर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ते कामोठेतील एका वसाहतीत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रवीण कांबळे या गृहस्थाशी ओळख झाली.
प्रवीण कांबळे याने तो तळोजा कारागृहात एपीआय या पदावर कार्यरत असल्याची बतावणी केली. तसेच त्याच्या डीआय या कंपनीमार्फत कारागृहात जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जातात असेही त्यांनी सांगितले. तसेच माणिक कारागृहातही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी टेंडर निघणार असल्याची माहितीही कांबळे याने दिली.
तसेच तुम्हाला ते टेंडर मिळवून देतो अशीही थाप त्यांनी मारली. त्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 23 लाख 45 हजारांची रक्कमही चिचुलकर यांनी त्याच्या डी. आय. कंपनीच्या नावे दिली.
यानंतर ठाणे येथील शिवाजी चौक येथे गाळा भाड्याने घेऊन चिचुलकर यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. नोव्हेंबर 2018 मध्ये कांबळे यांच्या डी. आय. कंपनीने पाण्याच्या बाटल्या घेणे बंद केले. यासंदर्भात चिचुलकर यांनी कांबळेला विचारले असता ठाणे कारागृहाचे टेंडर डिसेंबर 2018 ला निघणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर चिचुलकर यांनी तळोजा कारागृहात चौकशी केली असता तिथे प्रवीण कांबळे नावाची व्यक्ती कार्यरत नाही, असे कळाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी प्रवीण कांबळे आणि त्याची पत्नी सुनीता कांबळे यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Thane police file Fraud case against couple)
संबंधित बातम्या :
एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक
कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक