उत्तर प्रदेश | 21 फेब्रुवारी 2024 : बागपत येथील गावातील शेतकरी प्रभा शर्मा आपल्या शेतात शेती करत होते. अचानक त्यांना जमिनीतून कोणतरी ठोठावत आहे असा भास झाला. त्यांनी गावातल्या लोकांना कळवले. गावकऱ्यांनी मिळून खोदकाम सुरु केले. यावेळी त्यांना समोर जे काही दिसले त्याने ते हादरले. एक दोन नव्हे तर तब्बल 106 मानवी सांगाडे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने पुरातत्व खात्याला कळविले आणि सुरु झाले त्या जागेचे सर्वेक्षण. पुरातत्व खात्याने तिथे खोदकाम सुरु केले. त्यातून आणखी काही वस्तू जमिनीतून बाहेर येत होत्या.
यमुना नदीपासून 8 किमी अंतरावर सिनौली गाव आहे. या गावातच ही घटना घडलीय. सिनौली गाव सुमारे 4,000 बिघामध्ये पसरले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 11 हजार. त्यात जाटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दलित आणि मुस्लिम कुटुंबेही या गावात आहेत.
शेतकरी प्रभा शर्मा यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय पुरातत्व खात्याच्या टीमने त्या शेतात उत्खनन सुरु केले. टीमने आधी 106 मानवी सांगाडे सापडले. त्यांची कार्बन डेटिंग केली असता हे सांगाडे 3,000 वर्षांहून अधिक जुने असल्याचे आढळून आले. आणखी उत्खनन केले असता तिसऱ्या टप्प्यात त्या टीमला मोठे यश मिळाले. यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी पाहायला मिळाल्या.
उत्खनन केलेल्या शेतामध्ये आठ कबरी सापडल्या. त्यात हे मानवी सांगाडे होते. त्या सांगाड्याखाली शस्त्रे, चैनीच्या वस्तू, भांडी, प्राणी, पक्षी यांचे सांगाडे सापडले. आणखी खोदकाम केले असता मृतदेहांसोबत पुरलेले तीन रथ सापडले. या सर्व वस्तू 4,000 वर्षांहून अधिक जुन्या भारताच्या विकसित संस्कृतीचे प्रतिबिंब आहे असे पुरातत्व खात्याने सांगितले. या जमिनीतून सुमारे 4,000 वर्षे जुनी अँटेना तलवार आणि तांब्याचे चिलखतही सापडले.
सिनौलीमध्ये सापडलेले पुरावे हे ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास बदलण्यासाठी पुरेसा आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या जमिनीतून सापडलेल्या 4,000 वर्ष जुना रथ, अँटेना तलवार, शवपेटी अशा काही खास गोष्टी सापडल्या. त्या कोणत्याही उत्खननाच्या ठिकाणी सापडल्या नाहीत. सिनौलीची संस्कृती नंतरच्या वैदिक कालखंडातील आणि हडप्पा संस्कृतीमधील संस्कृतीशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर, स्थानिक लोक याचा संबध महाभारत काळाशी जोडत आहेत.