योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे: काटा म्हटलं तरी टोचल्याची जाणीव होते. त्यामुळे कोणीही सहसा अनवाणी चालताना पायात काटा घुसणार नाही याची काळजी घेतं. पायात चप्पल नसेल तर काट्यापासून वाचण्यासाठी सगळेच सावधपणे चालतात. अनेकदा चपलेतूनही काटे टोचल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पण तुमच्यापैकी कोणी कधी काट्यांवर उडी घेतली आहे का ? ऐकूणच भीती वाटते. पण हे खरं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या गावात काट्यांवर उडी घेतली जाते. या गावात काटेबारस यात्रा भरते, तिथं हा प्रकार केला जातो.
पळत येऊन भाविक उघड्या अंगाने काट्यावर उडी मारतात. काट्यावर उडी मारलेल्या भाविकाला नंतर बाहेर काढलं जातं. तिथं उभे असलेले स्वयंसेवक काटे बाजूला करून भाविकाला बाहेर काढतात. असेच अनेक भक्त दिवसभर काट्यांवर एका पाठोपाठ एक उड्या घेतात. दिवसभर इथं हेच दृश्य असतं. भाविक धावत येऊन रचलेल्या काट्यांच्या राशीवर अंग झोकून देतात. काही जण या काट्यावर अक्षरश: लोळताते. पाण्यात सूर मारण्यासाठी जशी उडी घेतली जाते तशी उडीही इथं मारली जाते.
उघड्या अंगानं काट्यावर घेतलेली उडी बघून सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. मात्र हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते.
पुरंदरमधील गुळुंचे इथला काटेबारस पाहण्यासाठी आजूबाजेच्या गावचे लोकही येतात. जिथे बघावं तिथं फक्त गर्दी आणि गर्दी असंच चित्र असतं.
काटेबारसची ही प्रथा कधी सुरु झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरु असल्याचं सांगितलं जातं. कार्तिक शुद्ध एकादशीला देवाच्या मुखवट्याला नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येतं. यावेळी नीरा गावातून ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येते. त्यानंतर मानकरी गेल्यावर्षी तोडून ठेवलेल्या बाभळीच्या काट्यांचे फास मंदिरा पुढील प्रांगणात टाकतात. बहिण भेटीनंतर भक्तजन देवदर्शनासाठी मंदिराकडे येतात. यावेळी रस्त्यामध्ये असलेली काट्यांची रास पार करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असतं. पण हे आव्हान लिलया आणि आनंदानं पार पाडलं जातं.
हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं. हौसेला जसं मोल नसतं, तसंच भक्तांच्या भक्तीलाही मोल नसतं. त्यांच्या भक्तीसमोर कोणतंही संकट त्यांना छोटं असतं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.