नागपूर : विवाहिते सोबत लग्न करण्याच्या मार्गात अडचण ठरत असलेल्या नातेवाईकाची हातोड्याने वार करत निर्घृण खून केल्याची घटना नागपुरात घडली. राहुल तुरकेल असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वाढदिवसाचा बहाना बनवत आरोपीने राहुलला आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर हातोडीने वार करत त्याचा खून केला. यानंतर आरोपीने घराला कुलुप लावून पळ ठोकला. मात्र, पोलिसांनी आरोपी रितेश सिकलवारला अटक करत त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुल तुरकेल हा त्याच्या आईचा उतारवयातील आधार होता. मात्र, आता त्याने जगाचा निरोप घेतला आहे. तो एका माथेफिरु रोमिओच्या रोषाला बळी पडला. आरोपी रितेश सिकलवार हा राहुलचा नातेवाईक होता. त्यामुळे त्याचे नेहमीच राहुलच्या घरी येणं-जाणं होतं. राहुलच्या घरी त्याच्या आत्याची विवाहित मुलगीही राहायची. आरोपी रितेशला तिच्यावर एकतर्फी प्रेम झालं. रितेशला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र, ती विवाहित आहे, रितेश तिच्याशी लग्न करु शकत नव्हता. रितेशला वारंवार समजावूनही तो समजायला तयार नव्हता. याच विषयावरुन राहुल आणि रितेशमध्ये अनेकदा वादही झाले.
राहुल आपल्या मार्गात अडचण ठरतोय म्हणून रितेशने त्याला संपवायचा निर्णय घेतला. रितेश राहुलच्या घरी गेला. माझा वाढदिवस आहे, आपण पार्टी करु असे सांगत तो राहुलला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर रितेशने राहुलच्या डोक्यात हातोडीने जोरदार वार केले. यामध्ये राहुलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रितेशने घराला कुलुप लावूल तेथून पळ काढला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपा रितेशला अटक केली. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रितेशचा आणखी कुणी साथीदार होता का याचा तपास पोलीस करत आहेत.