अबुधाबी : प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड म्हणजेच पबजी (PUBG) गेम ऑनलाईन खेळली जाणारी प्रसिद्ध गेम आहे. ही गेम लाँच झाल्यापासून तिला जगभरात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. ही गेम खेळण्यासाठी अनेक लोक एवढे वेडे होतात की त्यांना वेळ आणि ठिकाणाचेही भान राहात नाही. या गेमला घेऊन असाच एक वेगळा प्रकार समोर आला आहे.
संयुक्त अरब अमिरात येथे पतीने पबजी खेळण्यापासून रोखल्याने संतापलेल्या पत्नीने थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. पतीने पबजी गेम खेळू न दिल्याने पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर पतीने पत्नीला मारहाणही केली. अखेर संतापलेल्या पत्नीने थेट अजमान पोलीस ठाणे गाठले. पोलीस स्टेशनचे कॅप्टन वफा खलील अल होसानी यांनी सांगितले, “संबंधित महिला अजमान पोलीस स्टेशनच्या सामाजिक केंद्रात मदतीसाठी आली आणि तिने घटस्फोटाची मागणी करत कारण सांगितले. मनोरंजनाच्या साधनांच्या निवडीचा माझा अधिकार नाकारला जात आहे. मला आनंद देणाऱ्या आणि खेळता येणाऱ्या खेळापासून दूर ठेवले जात आहे, असे म्हणत या महिलेने घटस्फोटाची मागणी केली.”
दरम्यान, पबजी गेम याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे. मागील आठवड्यातच नवरदेव आपल्या लग्नातच पबजी गेम खेळताना आढळ्यानंतर या गेमची मोठी चर्चा झाली. पबजी गेममुळे मुलांना व्यसन लागत असून त्याचा तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याचा आरोप सरकारी संस्थांकडूनही झाला आहे. नेपाळमध्ये या गेमवर हीच कारणे देत बंदी घालण्यात आली आहे. नेपाळपाठोपाठ गुजरात सरकारनेही मागील महिन्यात या गेमवर बंदी घातली. त्यांनीही ही गेम किशोरवयीन मुलांसाठी आणि तरुणांसाठी घातक असल्याचे कारण दिले आहे.