नवी मुंबई : महागडे कपडे घालून हॉटेल्सना लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉनिल झोन असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण 187 हॉटेल्सना लुटलेले आहे. सध्या हा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात आहे. (Thief who has looted lots of hotels have been arrested in navi mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, स्व:तच्या कंपनीचे प्रेझेंटेशन असल्याचे सांगत आरोपी डॉनिल झोन वाशी येथील तुंगा हॉटेलमध्ये आला. 14 डिसेंबर रोजी कंपनीचे महत्त्वाचे प्रेझेंटेशन असल्याचे त्याने हॉटेल मालकाला सांगितले. त्यासाठी त्याने हॉटेल प्रशासनाकडून एक महागडा लॅपटॉप आणि महागडी दारुही मागवून घेतली. सोबत चांगल्या जेवणाची व्यवस्था करण्याचेही त्याने सांगितले. त्याने सांगितल्यानुसार तुंगा हॉटेलच्या प्रशासनाने सर्व तयारी केली. मात्र, ऐनवेळी आरोपी डॉनिल झोन याने हॉटेलमधून पळ काढला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेलच्या मालकाने पोलिसात धाव घेतली.
आपली लूट झाल्याचे लक्षात येताच तुंगा हॉटेलच्या मालकाने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे शोध घेत पोलिसांनी आरोपीला घोडबंदर येथून ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आतापर्यंत 187 हॉटेल्सची लूट केल्याचे समोर आहे. सुटाबुटात जाऊन हॉटेल्समधील महागडे सामान घेऊन तो पसार व्हायचा. आतापर्यंत त्याने लाखो रुपयांचे सामान लुटल्याचे तपसात समोर आले आहे.
पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे आणि सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्याचा शोध घेण्यात आला. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमान यांच्या पथकाने चोराला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले आहे की नवी मुंबई ते ठाणे या परिसरात अशी फसवणूक होऊ शकते. हॉटेलमध्ये रुम देताना KYC आणि पॅनकार्डची चौकशी कुरुनच रुम द्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.