FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

| Updated on: Dec 17, 2019 | 9:59 PM

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाताना तिथे लावण्यात आलेले कॅमरे या फास्टॅगला स्कॅन करतात. त्यानंतर टोलची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते.

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा...
Follow us on

मुंबई : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर 15 डिसेंबरपासून फास्‍टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे (FastTag). त्यामुळे आता प्रत्येक लहान किंवा मोठ्या वाहनांवर फास्‍टॅग लावणे आवश्यक झालं आहे. फास्टॅग वाहनांनी संबंधित मार्गिकेचा वापर केल्यास वाहनकोंडी कमी होण्यास मदत होईल. या योजनेमुळे टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होणार आहे (Toll Plaza). मात्र, वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत टोलनाक्यांवर मार्गिकेतून जाताना टोल भरण्यासाठी थांबावे लागत असे, त्यामुळे वाहन चालकांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला (FastTag).

फास्टॅगचा नियम लागू झाला असला तरीही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहेत.

प्रश्न : फास्टॅग काय आहे आणि कसं काम करतं?

उत्तर : डिजीटल पेमेंटला वाव देण्यासाठी फास्‍टॅगला राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवर लागू करण्यात आलं आहे. फास्‍टॅगला गाडीच्या विंडस्क्रीनवर लावावं लागतं. याला लावल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाताना तिथे लावण्यात आलेले कॅमरे या फास्टॅगला स्कॅन करतात. त्यानंतर टोलची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. ही प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होते. गाडीच्या विंडस्क्रीनवर लागलेला फास्टॅग मोबाईल फोनसारखा रिचार्ज होतो. फास्टॅगला My FASTag अॅप किंवा नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय आणि इतर कुठल्याही पद्धतीने रिचार्ज केलं जाऊ शकतं.

प्रश्न : FASTag रिचार्ज / टॉप-अपसाठी कुठली मर्यादा आहे का?

उत्तर : ग्राहक 100 रुपयांच्या मूल्यवर्गात फास्टॅग खात्याला रिचार्ज करु शकतात. तर रिचार्जची सर्वाधिक रक्कम ही वाहन आणि खातं लिंकच्या प्रकाराच्या आधारावर निश्चित केली जाते. रिचार्जची जास्तीतजास्त रक्कम सर्व बँकांच्या वेबसाईट्सवर देण्यात आली आहे.

प्रश्न : फास्‍टॅग कुणाला मिळणार?

उत्तर : फास्‍टॅग ती प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते जिच्याकडे चारचाकी वाहन किंवा कुठलं मोठं वाहन आहे. यासाठी वाहनाचं रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, अॅड्रेस प्रूफ व्यतिरिक्त केवायसी कागदपत्रांची एक प्रत आवश्यक असेल.

प्रश्न : फास्‍टॅगचा महिन्याचा पास कसा बनवता येईल?

उत्तर : महिन्याच्या पासची सुविधा प्रत्येक टोल नाक्यावर उपलब्ध आहे. तुम्ही महिन्याच्या पाससाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही एनएचएआयच्या वेबसाईटवरही महिन्याभराच्या पासची सुविधा मिळवू शकता.

प्रश्न : माझ्याजवळ दोन वाहनं आहेत. मग मी एक FASTag चा वापर दोन्ही वाहनांसाठी करु शकतो का?

उत्तर : ग्राहक एका वाहनसाठी फक्त एक टॅगचा वापर करु शकतात. एकदा हे FASTag गाडीच्या विंडस्‍क्रीनवर चिकटवलं, त्यानंतर त्याला काढता येणार नाही. जर तुम्ही जबरदस्ती हे टॅग काढण्याचा प्रयत्न कराल तर तो नष्ट होऊन जाईल आणि टोल नाक्यावर तुमच्या काहीही कामात येणार नाही.

प्रश्न : जर माझं FASTag टोल नाक्यावर काम करत नसेल तर काय करायचं?

उत्तर : जर तुमचं FASTag टोल नाक्यावर स्विकारलं जात नसेल तर तुम्ही टोल-फ्री क्रमांक 1033 वर संपर्क साधू शकता.

प्रश्न : माझं FASTag कुठल्या टोल नाक्यावर काम करेल? याची माहिती कुठे मिळेल?

उत्तर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील 536 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर हे FASTag स्विकारलं जाईल. या टोल नाक्यावर फास्‍टॅग लेन बनवण्यात आले आहे. हे लेन 500 मीटर दूरुनच नजरेस पडते. FASTag च्या माध्यमातून कशाप्रकारे टोल भरावा हे तुम्ही टोल बूथवरील कर्मचाऱ्यालाही विचारु शकता.

अधिक माहितीसाठी https://www.npci.org.in/sites/all/themes/npcl/images/PDF/Plaza%20Master-31-08-2019%20-%20PDF.pdf  या लिंकवर क्‍लिक करा. या संकेतस्थळी तुम्हाला सर्व टोल नाक्यांची माहिती मिळेल.

प्रश्न : FASTag बाबत कुठला टोल कर्मचारी चुकीची वागणूक करत असेल तर काय करायचं?

उत्तर : अशा परिस्थितीत टोल नाक्यावरील संबंधित प्रोजेक्‍ट डायरेक्‍टरजवळ आपली तक्रार नोंदवावी. शिवाय, या घटनेची तक्रार etcnodal@ihmcl.com या संकेतस्थळावरही केली जाऊ शकते. तसेच, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1033 वर संपर्कही साधू शकता.