मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?

| Updated on: Oct 07, 2024 | 10:31 PM

मेट्रो - 3 साठीचा अंदाजित खर्च 37 हजार 276 कोटी रुपये आहे. केंद्र आणि राज्याच्या सहभागातून हा प्रकल्प राबविला गेला आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा दररोज 13 लाख प्रवासी या मार्गाने प्रवास करू शकतील, रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
Follow us on

मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे. ही मेट्रो सर्वाथानं वेगळी असणार आहे. या मेट्रोचा संपूर्ण मार्ग 33.5 किलोमीटरचा असून कुलाबा – बीकेसी – सिप्झ असा तिचा विस्तार आहे. यातील बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे. या मेट्रोच्या पहिल्या मार्गामुळे मुंबईकरांना बीकेसी ते आरे JVLR स्थानक असा प्रवास एक तासांत करणे शक्य होणार आहे. तर या नव्या भुयारी मार्गिकेसाठी किती तिकीट असणार आहे हे आपण पाहूयात….

मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा बीकेसी ते आरे JVLR स्थानकापर्यत आहे. कुलाबा ते सिप्झ अशा संपूर्ण 33.5 किमीच्या मार्गिकेवर एकूण 27 स्थानके असून त्यातील एक स्थानक आरे JVLR स्थानक जमीनीवर इतर सर्व स्थानके भूमिगत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लाईन सुरु होईल. काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे त्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे संचालिक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील संपूर्ण भूमिगत मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे JVLR ते बीकेसीपर्यंत असून त्यावर एकूण 10 स्थानके आहेत.

 सध्या सहा मिनिटांना एक ट्रेन

दरदिवशी भुयारी मेट्रोच्या 96 फेऱ्या होणार आहेत, एकूण 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो सुरु असणार आहे. एकूण 48 ट्रेन कॅप्टन ( चालक ) असून त्यापैकी 10 महिला आहेत. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान 10 रुपये तर कमाल 50 रुपये असे असणार आहे. ट्रेनच्या फेऱ्या वाढतील तेव्हा तिकीटाचे दर कमाल 70 रुपये असतील.या प्रकल्पाची दर दोन म मिनिटाला एक ट्रेन चालविण्याची क्षमता आहे. परंतू आता पहिल्या टप्प्यात 9 ट्रेन द्वारे बीकेसी ते आरे जेव्हीएलआर स्थानक सरासरी दर 6 मिनिटांना एक ट्रेन अशी सेवा आहे.तर दुसऱ्या टप्प्यात 22 ट्रेनद्वारे सरासरी दर 4 मिनिटांनी एक ट्रेन चालविण्यात येणार आहे.

जादा पावसातही बंद पडणार नाही

या मेट्रोचा कफपरेड ते बीकेसी हा फेज दोन हा मार्च ते मे 2025 पर्यंत पूर्ण होईल असा आमचा अंदाज आहे, या टप्प्यात मोठी स्थानके आहेत, त्यामध्ये वरळी आणि गिरगांव येथे मोठी आव्हानं आहेत. वरळी नाका आणि गिरगांव स्टेशन ही चॅलेंजिंग स्टेशन आहेत. उदघाटन विषयी आणखी राज्य शासनाकडून काही पूर्तता बाकी आहेत. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या मेट्रोला वापरता येणार आहे.30 ऑक्टोबरपर्यत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधा तयार करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांत मेट्रोचे हे टनल तयार करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांतील कमाल पावसाची झालेली नोंद लक्षात घेऊनच हे टने्ल बनवले आहेत. टनेलमध्ये जरी थोडे पाणी आले तरी त्याचा निचरा करण्यासाठी देखील यंत्रणा आहे. खुप जास्त पाऊस झाला तरी भुयारी मेट्रो बंद पडणार नसल्याचे म्हटले जात आहे.

under ground metro – 3 map

इंटर चेंजिंग पॉईंटमुळे फायदा

आरे ते कफ परेड हे काम सरासरी 93 टक्के पूर्ण झालं आहे. ही लाईन लोकल ट्रेन, बेस्ट, एअरपोर्ट, एसटी डेपो याला कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलून हवे तेथे जाता ( इंटर चेंजिंग पॉईंट ) येणार आहे. त्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड उपयोगी ठरणार आहे.  हा प्रकल्प 2011 ला मंजूर झाला तेव्हा 23 हजार 900 कोटी रुपये अंदाजित खर्च होता. परंतू प्रत्यक्षात 37 हजार कोटीहून अधिक पैसे लागले आहेत. प्रत्यक्षात टेंडर काढेपर्यंत आणि काही बदल केल्याने ही कॉस्ट वाढली आहे. केंद्राकडून आम्हाला पूर्ण पैसे मिळाले आहेत. बुलेट ट्रेनला कनेक्ट करता येईल का याकडे लक्ष दिले जात आहे. आम्ही मध्यंतरी जाहिरात केली होती की bkc स्थानकाला कनेक्ट व्हायचे असेल तर होऊ शकता त्यानुसार प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भुयारी मेट्रोची स्थानके

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅंड रोड मेट्रो, जगन्नाथ शंकरशेठ मेट्रो, महालक्ष्मी मेट्रो, सायन्स सेंटर, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर मेट्रो, शितलादेवी मंदिर, धारावी, बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रुझ मेट्रो, एअर पोर्ट टर्मिनल-1, सहार रोड, एअर पोर्ट टर्मिनल-2, मरोळ नाका, एमआयडीसी- अंधेरी, सिप्झ, आरे जेव्हीएलआर.