चंद्रपूर : विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात एका वाघिणीची शिकार करण्यात आली. विशेष म्हणजे ताडोबाच्या इतिहासात कोअर क्षेत्रात वाघाच्या शिकारीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे वनविभागाला मोठा धक्का बसला आहे. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या खातोडा गेट परिसरात ही घटना उघडकीस आली. ताडोबातील हा भाग सामान्य लोकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नाही. मात्र कोअर क्षेत्रात तारांचा फास लावून वाघिणीची शिकार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. सर्वात संरक्षित वन क्षेत्रात वाघिणीची शिकार झाल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे.
वनविभागाच्या परवानगीने गेटवरुन फक्त पर्यटकांच्या गाड्या सोडल्या जातात. असे असतानाही या भागात शिकाऱ्यांनी प्रवेश केला आणि तारांचा फास लावला. ज्यामध्ये अडकून 2 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वात संरक्षित अशा कोअर क्षेत्रात ही शिकार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत वन्यजीवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात जर शिकारी प्रवेश करुन वाघाची शिकार करत असतील, तर यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही अशी भावना वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. ताडोबा प्रशासनाने पर्यटनापेक्षा वाघांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एखाद्या अन्य वन्यजीवाच्या शिकारीसाठी हे सापळे लावले असावेत आणि त्यात अडकून वाघिणीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, या भागात वनविभाग आणि संबंधित अधिकारी यांच्याशिवाय अन्य कुणालाही प्रवेशाची परवानगी नाही, मग सापळे लावले कुणी असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.