मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा कोरोना चाचणी, क्वारंटाईन आणि ई-पास तारेवरची कसरत करावी लागत असतानाच सरकारने टोलमधून दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी केल्याची घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Toll Concession on Visit to Konkan during Ganeshotsava Eknath Shinde announces)
गणेशोत्सव सुरु होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : कोकणात गणेशोत्सवादरम्यान 24 तास वीज पुरवठा : ऊर्जामंत्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षीप्रमाणे टोल माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. pic.twitter.com/GbwEzh0uvu
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 13, 2020
(Toll Concession on Visit to Konkan during Ganeshotsava Eknath Shinde announces)