नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोविड-19 च्या संसर्गाच्या 6761 रुग्णांची नोंद झाली आहे (Total Corona Patient in India). दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 206 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात देशात एकूण 896 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ही संख्या आतापर्यंतच्या आकडेवारीतील सर्वाधिक आहे. संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लव अग्रवाल म्हणाले, “कोरोना विरोधात लढा देण्यासाठी भारत सरकारने 15,000 कोटी रुपयांच्या ‘भारत कोविड 19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज’ ला मंजुरी दिली आहे. कोविड19 प्रतिसाद पॅकेज अंतर्गत, राज्यांना वैद्यकीय पायाभूत सुविधा अद्ययावत करणे, कोविड उपचार समर्पित रुग्णालये, चाचणी सुविधा अद्ययावतीकरण, PPE सारख्या वस्तूंचा पुरवठा, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अशा सर्व गोष्टींसाठी सहाय्य केले जाईल. कोविड 19 च्या काळात रक्तपेठींनी एक जीवरक्षक व्यवस्था म्हणून कशाप्रकारे काम करावे आणि त्यांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याबाबत आरोग्य मंत्रालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.”
व्हेंटिलेटर, फेस मास्क, सर्जिकल मास्क, PPE, कोविड19 चाचणी किट्स आणि इतर संबंधित वस्तूंचा सुरळीत पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी या सर्व वस्तूंना सीमाशुल्क आणि आरोग्य उपकरातून सवलत देण्यात आली आहे. जास्त धोका, मध्यम धोका आणि सौम्य धोका अशा विविध भागात, विविध प्रकारच्या PPE च्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने एक व्हिडिओ टूल जारी केले आहे, अशीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन संपत आहे. त्यामुळे हा लॉकडाऊनचा कालवधी 14 एप्रिलच्या पुढे वाढवला जाणार की लॉकडाऊन हटवणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्या सूचना जाणून घेत आहेत. लवकरच स्वतः पंतप्रधान याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती
दोन परिचारिकांना ‘कोरोना’, दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश
Total Corona Patient in India