पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड

| Updated on: Jun 20, 2020 | 5:40 PM

पावसाळ्याला सुरुवात होताच दरवर्षी साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते (Thoseghar Waterfall in Satara amid lockdown).

पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड
Follow us on

सातारा : पावसाळ्याला सुरुवात होताच दरवर्षी साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते (Thoseghar Waterfall in Satara amid lockdown). मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा काहीसा हिरमोड होत आहे. सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना स्वच्छंदीपणे मनमोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचे ठिकाण म्हणजेच “ठोसेघरचा धबधबा”. साधारण 350 मीटर उंचावरुन कोसळणारा पांढराशुभ्र ठोसेघरचा धबधबा आणि या कोसळणाऱ्या धबधब्यासोबत या ठिकाणचा निसर्ग नेहमीच पर्यटकांना खुणावत आला आहे. या ठिकाणी अंगाला झोंबणाऱ्या आल्हादायक वाऱ्याला मात्र यावर्षी पर्यटकांना मुकावं लागणार आहे.

दऱ्या कपारीतून वाट काढत तब्बल 1100 फूट खोल दरीत कोसळणारा ठोसेघरचा धबधबा यंदाच्या वर्षी कोरोनामुळे पर्यटकांविना कोसळत आहे. या धबधब्याने केवळ महाराष्ट्रच नाही, तर परदेशी पाहुण्यांनाही आपलेसे केले. अनेक परदेशी पाहुणे दरवर्षी येथे भेट देत असतात. कोरोनामुळे यंदा पर्यटकांना हे सर्व अनुभवायला मिळणार नाही.

सातारा जिल्ह्याला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. या निसर्गात प्रसिद्ध ठोसेघर धबधबा जून महिन्यातच फेसाळला आहे. डोंगर दऱ्यांना पालवी आणि पाझर फुटू लागल्याने निसर्ग हिरव्या रंगाने नटला आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, साताऱ्याचे निसर्ग पर्यटन बहरते. मात्र, यंदा लॉकडाऊन असल्यामुळे आणि प्रशासनाचे पर्यटनस्थळ बंद असल्याने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांविनाच ओसाड पडलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. सरकारने पर्यटनस्थळे सुरु करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेले व्यवसाय सुरु होऊन कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा स्थानिक करत आहेत.

सातारा जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या 3 महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. यामुळे या पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना थोडी वाटच पहावी लागणार आहे.

हेही वाचा :

 

Thoseghar Waterfall in Satara amid lockdown